बीड : एका महिला वकिलास तिच्या पतीने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शिरूर पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविकिरण विष्णू सानप असे त्या आरोपीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील ॲड. शीतल यांचा विवाह शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील रविकिरण विष्णू सानप याच्यासोबत २०२१ मध्ये झाला होता. लग्नाच्या एक वर्षानंतर सासू व तीन नणंदा शीतल यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पती रविकिरण हा दारू पिऊन मारहाण करीत होता. त्यामुळे शीतल यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजी गडचिरोली पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जाच्या सुनावणीसाठी शीतल यांची पती रविकिरण व सासरचे कोणीच हजर राहिले नाहीत. गडचिरोली येथील भरोसा सेल यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी पुढील कारवाई करीता पत्र दिले. त्यामुळे ८ फेब्रुवारी २०२५ आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी रविकिरण सानप हा व्यवसायाने वकील असल्याचे समजते.
काय घडली घटना ?आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी शीतल सानप यांना शिरूर येथील सासरच्या राहत्या घरी शेळके बिल्डिंग हॉल येथे बोलावले होते. त्यानुसार त्या तिथे गेल्या असता रविकिरण सानप हा पोलिसांसमोरच शीतल यांच्या अंगावर धावून गेला, हिचे हात-पाय तोडणार, हिचे खानदान संपवणार आहे, अशी धमकी दिली. आष्टी येथे मीच खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्यात तुझा बाप व भाऊ कसा फसवला आहे असे म्हणत अश्लील भाषेत शिव्या दिल्या. त्यावेळी आरमोरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते, रणजित पिल्लेवान, कुंदा व प्रधान हंसराज धस हे पंच उपस्थित होते.
पोनि गवते यांनी शीतल यांना शांत बसण्यास सांगितले. पंचनामा झाल्यानंतर उपस्थित पोलिस, दशरथ वनवे व फिर्यादी शीतल सानप या शिरूर ठाण्यात गेल्या असता रविकिरण सानप हा तेथे आला. पाेलिसांसमोर शिव्या देऊन कोण पंच आले होते, कोण स्टेटमेंट देतो असे म्हणत शीतल यांना हात-तोंडावर चापटांनी मारहाण केली, तसेच शीतल यांचे काका दशरथ वनवे यांना शिवीगाळ करून त्यांच्याही अंगावर धावून गेला. त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस अशोक सोनवणे, बावनकर व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी रविकिरण यास हाताला धरून बाहेर काढले तरी तुझ्या भावाचे तुकडे करणार असल्याची धमकी दिली. याप्रकरणी रविकिरण विष्णू सानप याच्या विरुद्ध शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.