बीड : शहागड येथून गेवराईत खरेदीसाठी आलेल्या महिलेवर अज्ञात दोन ते तीन जणांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, सध्या तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.
खामगाव (ता. गेवराई) परिसरातील शीतल कटमिल्ला पवार (वय ३०) ही मैत्रिणीसोबत खरेदीसाठी गेवराईत आली होती. तोंडाला कापड बांधलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी दोघींना मारहाण सुरू केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या वेगवेगळ्या दिशांना पळाल्या. दरम्यान गोळीबार करण्यात आला. यात शीतल पवार यांच्या छातीत गोळी घुसली. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना गंभीर अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. एक्स-रे तपासणीत छातीत गोळी अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हात-पायांवर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जबाब नोंदविण्यासाठी पोलिस पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. या घटनेबाबत पोलिसांनी पीडितेला विचारणा केली असता स्पष्ट माहिती देण्यास तिने नकार दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक लंके यांनी दिली.
कौटुंबिक वादातून घटनागेवराई येथे कुठेही गोळीबार झाल्याची माहिती मिळाली नसल्याचे तसेच गेवराई उपजिल्हा रुग्णालयातही नोंद नसल्याचे गेवराई पोलिसांनी स्पष्ट केले. शीतल व संदीप हे पती-पत्नी असून, ते घरातून खामगाव येथे सोबत गेले होते. शीतल ही शहागड (जालना) येथे राहते. तिचे आई-वडील हे खामगाव (ता.गेवराई) येथे राहतात.
गोळी कोणी मारली सांगता येत नाहीमी, माझे पती आणि माझी सवत आमच्यात घरगुती भांडण झाले ते मिटविताना माझ्या सवतीच्या भावाने तसेच बहिणीने मारहाण केली. त्यावेळी माझा पतीदेखील हजर होता. परंतु, मला गोळी कोणी मारली हे नक्की सांगता येत नाही, असे शीतलने सांगितले. सदर घटना ही कुठे घडली याबाबत काही एक सांगत नाही. सदर महिलेच्या पतीने दोन लग्न केलेले असून, दोन्ही पत्नींमध्ये कौटुंबिक वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमी महिलेची प्रकृती नाजूकघटनेबाबत पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता महिलेची प्रकृती नाजूक असून, गोळीचे तुकडे झाले असल्याने सध्या कंडिशन स्टेबल झाल्यानंतर पुढील उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शीतल हिने सुट्टी झाल्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन सविस्तर जबाब देते असे सांगून सध्या जबाब देण्याचे टाळले आहे, असे गेवराई पोलिसांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची धावपळगेवराईतील गोळीबारातील जखमी महिलेला छत्रपती संभाजीनगरातील घाटीत दाखल केल्यानंतर नातेवाईक पोहचले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. घाटीत गोळीबार झाल्याचीही चर्चा सुरू झाली. बेगमपुरा पोलिसांनी वेळीच दखल घेत जखमी महिलेला पाच पोलिसांचे संरक्षण दिले आहे. त्याशिवाय घाटीत पोहचलेल्या नातेवाईकांना काढून देण्यात आल्याची माहिती बेमगपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. दरम्यान, घाटीतून पोलिस नियंत्रण कक्षाला गोळीबार झाल्याचा निरोप पोहचल्याने एकच खळबळ उडाली. शहर पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात पोहचली. त्यानंतर संबंधित फोनवर संपर्क केल्यानंतर शहरात गोळीबार झाला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तसेच उपचार घेत असलेल्या महिलेला पोलीसा संरक्षण देण्यात आले आहे.