बीड: शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एक लैंगिक छळाची तक्रार समोर आली. त्यानुसार विजय पवार याच्याविरुद्ध बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी नगर पोलिस ठाण्यात एका १४ वर्षीय मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२-२३ मध्ये पीडित मुलगी व तिची बहीण बीड शहरातील विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेमध्ये शिकत होत्या. २०२२ मध्ये दिवाळीच्या परीक्षेचे हॉलतिकीट मिळाले नसल्याने मुलगी प्रिंसिपलकडे गेली तेव्हा पालकांना घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी शाळेत प्रिंसिपलची भेट घेतली. तरीही पीडित मुलीस शाळेच्या वर्गात बसू दिले जात नव्हते. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना या शाळेत नेऊन विजय पवार यांना बोलले होते. त्यानंतरही त्या मुलीस शाळेत बसू दिले गेले नाही. त्यानंतर पीडितेचे आजोबा शाळेत गेले. आता तुझा जावई माझ्याविरोधात तक्रार करतो, म्हणून त्याच्या मुलीस मी माझ्या शाळेत शिकू देणार नाही, तुला काय करायचे ते कर, त्याला मी समर्थ आहे, असे म्हणत दोन्ही मुलींना शाळेत येऊ दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
असे आले प्रकरण उजेडातकाही दिवसांपूर्वी उमाकिरण क्लासेसमधील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. २६ जून रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २८ जून रोजी विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना अटक झाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर पीडित मुलीने शाळेत झालेली आपबिती तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
आमच्या शाळेत शिकायची लायकी नाही...१३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता प्रिंसिपलने १४ वर्षीय मुलीस बोलावून घेत सांगितले की, तुझी फीस भरलेली नाही. त्यानंतर पुन्हा दोन-तीन दिवसांनी प्रिंसिपलने कॅबिनमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी विजय पवार हासुद्धा तिथे होता. प्रिंसिपल क्लासला भेट देण्यास गेल्या तेव्हा विजय पवार म्हणाला की, तुझे वडील शाळेची फीस का भरत नाहीत, त्यावर उत्तर देत फीस भरल्याचे पीडितेने सांगितले. तुमच्या लोकांची आमच्या शाळेत शिकायची लायकी नाही तरी पण मी शिकू देत आहे. तुझा बाप आमच्या शाळेच्या विरोधात चालला आहे. मी तुला आता स्कूलमध्ये बसू देणार नाही, असे म्हणत त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. एका हाताने गाल ओढत बॅडटच असा लज्जास्पद स्पर्श केला, या आशयाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.