बीड: भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; पालकमंत्र्याचे नाव सांगून सीईओंना शिवीगाळ
By सोमनाथ खताळ | Updated: May 11, 2023 22:05 IST2023-05-11T22:04:56+5:302023-05-11T22:05:23+5:30
पोलिसालाही धक्काबुक्की, जिल्हा परिषदेतील प्रकार

बीड: भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; पालकमंत्र्याचे नाव सांगून सीईओंना शिवीगाळ
"तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजता," असे म्हणत वडवणी येथील भाजप कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दालनात घुसून शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांच्या अंगरक्षाकालाही धक्काबुक्की केली. हा प्रकार गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत घडला. याप्रकराने खळबळ उडाली आहे.
धनराज राजाभाऊ मुंडे (रा.वडवणी) असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. गुरूवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सीईओ पवार हे वॉर रूममधील शिक्षकांची बैठक घेत होते. याचवेळी धनराज हा आत आला. त्याने "तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, तुम्ही स्वत:ला काय समजता, लावू का पालकमंत्र्यांना फोन, तुम्ही पालकमंत्र्यांना बोला," असे म्हणत गोंधळ घातला. त्यानंतर सीईओ पवार यांना शिवीगाळ केली. दालनातील हा आवाज ऐकून अंगरक्षक सचिन साळवे व स्वीय सहायक सचिन सानप हे दालनात आले. त्यांनी धनराजला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने साळवे यांच्याशीही हुज्जत घातली. शिवाय त्यांनाही धक्काबुक्की करत शासकीय गणवेशावरील पोलिस पदक तोडून नुकसान केले.
या प्रकारानंतर स्वत: पवार यांनी बीड शहर पोलिसांन फिर्याद दिली. यावरून धनराज मुंडे विरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रवि सानप यांच्याकडून याला दुजाेराही मिळाला. या प्रकाराने मात्र, सर्वत्र खळबळ उडाली आहे.