परळी: दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत शहरातील गोविंद सारस्वत(वय 53 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. शहरातील गणेशपार भागातील जंगम गल्ली येथील रहिवासी असलेले गोविंद हिरालालजी सारस्वत(खडकीवाला) कामावरुन घराकडे जात असताना सोमवार रात्री परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या चेंबरी विश्रामगृहाजवळ अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद सारस्वत सोमवारी रात्री 10.30 वाजता चेंबरी विश्रामगृहाजवळून जात होते. यादरम्यान उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाची त्यांची टक्कर झाली. अपघातानंतर गंभीरजखमी झालेल्या गोविंद सारस्वत यांना तात्काळ परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, डोक्यास व हातास गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान रात्री 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्वगोविंद सारस्वत हे खाजगी कोल डेपोवर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे व अत्यंत मनमिळावू व्यक्ती म्हणून ते शहरात प्रसिद्ध होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता परळीतील राजस्थानी मुक्तीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अद्याप गुन्ह्याची नोंद नाहीगोविंद सारस्वत यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, भाऊ-बहिणी, पुतण्या-पुतणी असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्यात दुपारी तीन वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. कोणत्या वाहनाने धडक दिली, कसा अपघात झाला, हे मात्र दुपारपर्यंत समजू शकले नाही. या अपघातप्रकरणात जवाब घेण्यात येईल त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.