मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाममुळे बीड ठप्प
By Admin | Updated: January 31, 2017 14:07 IST2017-01-31T14:06:20+5:302017-01-31T14:07:13+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासहीत अन्य मागण्यांसाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाममुळे बीड ठप्प
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 31 - मराठा समाजाच्या आरक्षणासहीत अन्य मागण्यांसाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या केला . त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जिल्हा ठप्प झाला.
मंगळवारी सकाळी 11 वाजता बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलनकर्ते एकवटले. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊवंदना घेण्यात आली. यावेळी चौकाच्या चारही टोकांमध्ये तरुणांनी ठिय्या देत घोषणाबाजी केली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ‘एकच मिशन, मराठा आरक्षण...’ आरक्षण देत कसे नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाहीत... अशा घोषणा देण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचाही जयघोष करण्यात आला. गेवराई, पाटोदा, माजलगाव, धारुर, अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर, वडवणी, केज येथेही आंदोलन झाले. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
वाहने अडकली
या आंदोलनामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बीडमध्ये बसस्थानक व बार्शी रोडवर मालवाहू वाहने अडकून पडली होती. सकाळी 11 वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होते.