बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी बीडला डॉक्टरला तीन वर्षे सक्त मजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:49 IST2018-03-23T00:49:15+5:302018-03-23T00:49:15+5:30
बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.शिवाजी सानप यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील दुसरे जिल्हा न्या. ए.एस.गांधी यांनी सुनावली. २०११ साली बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात काही अर्भके मृतावस्थेत आढळून आली होती.

बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी बीडला डॉक्टरला तीन वर्षे सक्त मजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.शिवाजी सानप यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील दुसरे जिल्हा न्या. ए.एस.गांधी यांनी सुनावली.
२०११ साली बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात काही अर्भके मृतावस्थेत आढळून आली होती.
पोलिसांनी याचा तपास केल्यानंतर ही अर्भके डॉ. शिवाजी सानप याच्या रूग्णालयात झालेल्या गर्भपाताची असल्याचे समोर आले होते. त्यानंतर तात्काळ सानपसह रुग्णालयातील त्याचे सहकारी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, गर्भपात प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते. पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी तपास करून दोषारोप न्यायालयात सादर केले होते.
सदर प्रकरणाची सुनावणी दुसरे जिल्हा न्या. ए. एस. गांधी यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात रिक्षा चालक आणि पोलीस कर्मचाºयांची साक्ष महत्त्वाची ठरली, तर काही साक्षीदार फितूर झाले.
सानप याच्याविरुद्ध गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ खालील बेकायदा गर्भपाताचा गुन्हा सिद्ध झाला, तर इतर आरोप अभियोग पक्षाला सिद्ध करता आले नाहीत. न्यायालयाने बुधवारी सानपला दोषी ठरवले होते. गुरुवारी त्याला गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ खाली तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.
सात वर्षांपूर्वीच्या अर्भक मृत्यू प्रकरणात गर्भपात प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेल्या डॉ. शिवाजी सानप याने यातील १८ महिन्याची शिक्षा यापूर्वीच भोगलेली आहे. राज्यात व देशात गाजलेल्या या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गुरुवारी न्यायालयाने हा निर्णय दिला.
निर्णयाकडे होते लक्ष : गाजलेले प्रकरण
बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या प्रकरण राज्यात गाजले होते. याच दरम्यान, बीडमध्ये डॉ.शिवाजी सानप याच्या रूग्णालयात गर्भपात झाल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.