आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:38 IST2019-03-14T23:37:03+5:302019-03-14T23:38:14+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले.

आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय
बीड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. यंशवतराव चव्हाण नाट्यगृहातील सभागृहात निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, यासह मतदार संघातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, आचारसंहितेची नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शकतेने अमलबजावणी होणे गरजेचे आहे. याकालावधीत कार्यवाही करताना मानवी चुका कमी व्हाव्यात याकडे लक्ष दिले जावे. कर्तव्य बजावताना आपल्यावरील जबाबदारीचे सद्दविवेकीपणे पालन केले जावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे आवश्यक असलेले अहवाल, प्रपत्र आदी नियमितपणे आणि काळजीपूर्वक पूर्ण करुन संबंधितांनी दिले पाहिजेत या दृष्टीने जिल्हास्तरावरुन उमेदवारांचा निवडणूक खर्च, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबाबतच्या सूचना, सी-व्हीजील अॅप वरील तक्रारी आपल्या पर्यंत पोहचतील त्यावर तातडीने कारवाई आपेक्षित आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराशी संबंधित होंर्डीग्स, पोस्टर्स काढले जाणे गरजेचे होते याअनुषंगाने जिल्ह्यातील नगरपरिषदा, शासकीय प्रसिध्दीच्या एसटी बसेस वरील जाहिराती आढळून आल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश पाण्डेय यांनी यावेळी दिले.