बापरे, ४८ दिवसानंतर आला चौकशीचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:42+5:302020-12-29T04:31:42+5:30
बीड : येथील वरिष्ठ तुरूंग अधिकारी संजय कांबळे यांचा बीडमधील लोटस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. यात हलगर्जी झाल्याचा आरोप ...

बापरे, ४८ दिवसानंतर आला चौकशीचा अहवाल
बीड : येथील वरिष्ठ तुरूंग अधिकारी संजय कांबळे यांचा बीडमधील लोटस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. यात हलगर्जी झाल्याचा आरोप करीत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी करण्यासाठी समितीने तब्बल ४८ दिवस लावले आहेत. केवळ प्रकरण दडपण्यासाठी समितीने हा अहवाल उशिरा दिल्याचे सामजते. असे असले तरी शल्य चिकित्सक यावर काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.
संजय कांबळे यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल २३ ऑक्टोबर रोजी आला. त्यांनी बीडमधीलच लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. १ नोव्हेंबर रोजी सुटी मिळाली. परंतु घरी जाताच त्यांना त्रास सुरू झाला. ३ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणात डॉक्टरांचा हलगर्जी झाल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी तक्रार केली होती. यावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.संजय कदम आणि डॉ.मंडलेचा यांची समिती चौकशीसाठी नियूक्त केली. कोरोनासारखे गंभीर प्रकरण असतानाही आणि तुरूंग अधिकारी या मोठ्या पदावरील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही चौकशी करण्यासाठी समितीने तब्बल ४८ दिवसांचा कालावधी लावला. यावरून हे प्रकरण दडपण्यासाठी समितीने मुद्दाम उशिर केल्याचा आरोप होत आहे. असे असले तरी आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
सीएसच्या आदेशाकडेही दुर्लक्ष
या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात खूद्द सीएस डॉ.गित्ते यांनी अनेकदा डॉ.राठोड यांना सूचना केल्या होत्या. त्यांनीही होकार दिला. प्रत्यक्षात मात्र काहीच उपयोग झाला नाही. नेहमी कारणे सांगून हा उशिराने अहवाल देण्यात आला. याबाबत केवळ नोटीस बजावून समितीचा पाहुणचार करण्यात आला. यावरून डॉ.गित्ते यांच्या सूचनांचा वचक कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नसल्याचे दिसत आहे.
कोट
लोटस हॉस्पिटलच्या तक्रारीची चौकशी पूर्ण होऊन अहवाल कार्यालयात आला आहे. आता यावर निर्णय दिला जाईल.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड