दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजार रुपयांचे बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:34+5:302021-07-04T04:22:34+5:30

बीड : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत २०२१ मधील उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरण करण्याबाबत ...

A bank account of one thousand rupees will have to be taken out for one and a half hundred rupees | दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजार रुपयांचे बँक खाते

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजार रुपयांचे बँक खाते

बीड : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत २०२१ मधील उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरण करण्याबाबत शिक्षण संचालकांनी निर्देश दिले आहेत. दीडशे ते तीनशे रूपयांसाठी आधी पालकांना एक हजार रूपये नवे खाते उघडण्यासाठी मोजावे लागणार आहेत. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा भाग म्हणून शालेय पोषण आहार योजने अंतर्गत २०२१ उन्हाळी सुटीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेचे आर्थिक सहाय्य थेट लाभ हस्तांतरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचे नियोजन केले आहे.

केंद्र शासनाच्या नियोजनाप्रमाणे योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उन्हाळी सुटीच्या कालावधीतील आहार खर्चाची रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासन निर्देशानुसार सर्व तालुक्यातील पोषण आहार योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक बँक खाते विहित नमुन्यात अद्ययावत करून तयार ठेवावे. तसेच ज्यांचे खाते उघडलेले नसेल अशा विद्यार्थ्यांचे आधार लिंक बँक खाते उघडण्याबाबत लेखी सूचना निर्गमित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शालेय पोषण आहार बीड जिल्हा एकूण लाभार्थी ३,३६,४९५

शहरी भागातील लाभार्थी ८४,५३५

ग्रामीण भागातील २,५१,९६०

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली - ४४,८७७

दुसरी - ५०,७९०

तिसरी - ५३,२९७

चौथी - ४९,८९५

पाचवी - ५२,८३३

सहावी - ५२,८९७

सातवी - ५२,०१४

आठवी - ५१,७०२

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६ रुपये

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४ रुपये

३) बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

बँकेत खाते उघडण्यासाठी कमाल एक हजार रूपये लागतात. परंतु लहान मुलांचे खाते उघडताना केवायसी व अन्य कारणांमुळे विलंब होतो. यात एटीएम कार्ड व सेवेचा लाभ दिला जातो. मागील वर्षीच अग्रणी बँकेच्या माध्यमातून नवीन खाते उघडण्यासाठी विभागनिहाय बँका ठरवून दिलेल्या आहेत. परंतु १५० ते ३०० रूपयांसाठी एक हजार रूपये आधी जमा करणे अनेक पालकांना अशक्यच आहे.

पालकांची डोकेदुखी वाढली

कोरोना संकट काळात निर्णय चुकीचा आहे. शालेय पोषण आहाराच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशासाठी बँकेत खाते उघडण्यासाठी शाळांकडून सूचना दिल्या जात आहे. मिळणारे पैसे व बँकेत खाते उघडण्यासाठी लागणारे पैसे यात मोठी तफावत असून हे जाचक धोरण तत्काळ बदलण्याची गरज आहे. - अरूण चोपडे, पालक, धारूर.

--------

शासनाने शालेय पोषण आहारच द्यावा, बँकेत खाते उघडण्याचे धोरण बदलावे.

आहाराऐवजी पैसे देण्याचा व ते थेट बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय हा पालकांना दुहेरी काम लावणारा आहे. खाते उघडण्यासाठी व नंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी विद्यार्थ्याला बँकेत खेटे मारायला लावणारा निर्णय तत्काळ मागे घ्यावा. - सुहास कांबळे, पालक, धारूर.

----------

मुदत वाढवून देण्याची गरज

लाभार्थी बालकांचे खाते उघडण्यासाठी ९ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. लाभार्थी बालकांची संख्या पाहता किमान दोन लाख विद्यार्थ्यांचे नवीन खाते उघडण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे खाते उघडण्यासाठी मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे किंवा हा निर्णय रद्द करून पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.

----------

बीइओंमार्फत शाळांना सूचना दिल्या

शालेय पोषण आहार योजनेत तालुक्यातील पात्र सर्व लाभार्थ्यांचे शंभर टक्के बँक खाते उघडण्यात यावेत. ९ जुलैपर्यंत बँक खात्याची सर्व अद्ययावत माहिती तालुकास्तरावर जतन करावी. बँक खाते उघडण्यासाठी शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करावी, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शालेय पोषण आहार अधीक्षकांना दिलेले आहेत. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

Web Title: A bank account of one thousand rupees will have to be taken out for one and a half hundred rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.