औरंगाबादची पुनरावृत्ती बीडमध्ये एमआयएम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:59 IST2019-10-09T23:58:33+5:302019-10-09T23:59:28+5:30
क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.

औरंगाबादची पुनरावृत्ती बीडमध्ये एमआयएम करणार
बीड : औरंगाबादच्या जनतेने इतिहास घडवून इम्तियाज जलील यांना निवडून दिले. जलील यांनी तेथील प्रस्थापित शिवसेना नेत्याच्या सत्तेला सुरुंग लावला. आता बीडमध्येही शेख शफीकभाऊ शिवसेनेचा पराभव करून औरंगाबादची पुनरावृत्ती करतील. क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.
येथील इज्तेमा मैदानावर मंगळवारी बीड विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार शेख शफीक आणि माजलगाव मतदारसंघातील शेख अमर जैनोद्दीन यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मतीन, महेफुजुर रहमान, जिल्हाध्यक्ष शेख निजाम, उमेदवार शेख शफीकभाऊ, शेख अमर यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष खयूम इनामदार, नगरसेवक शेख मतीन, हाफिज अशफाक , समीभाऊ, मोमीन अझहर, हरिसन फ्रांसिस, एजाज इनामदार उर्फ खन्नाभाई, शिवाजी भोसकर, सचिन गाडे, हाजी आयुब पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी खा. ओवेसी म्हणाले, मजलिसला राजकीय वारसा आहे. ७० वर्षाच्या राजकीय प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे मजलिस कोणाच्या मालकीची नाही. ती सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे, त्यामुळेच आम्हाला यश मिळत असल्याचे ओवेसी म्हणाले. एमआयएम सेटिंग करते, असा आरोप आमच्यावर केला जातो. मात्र नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे , शरद पवार आपल्या सेटिंगचे काय गुपित आहे ? तेही मला एकदा सांगा, असे खुले आव्हान ओवेसी यांनी दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पिक्चर ‘दी एन्ड ’ होत असून या दोघांनाही आता भविष्य नसल्याचे ओवेसी म्हणाले. ट्रीपल तलाकच्या वेळी शरद पवार यांची धर्मनिरपेक्षता कोठे होती, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी तबरेज आणि मॉबलिंचिगच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. बीडमध्ये भूतबंगला आहे. ज्यांचे केवळ ८०० मतदान आहे, ते बीडवर राज्य करत आहेत. जयदत्त क्षीरसागर आधी राष्ट्रवादीत होते, त्यांनी शिवसेनेत उडी मारली. त्यापाठोपाठ आधी आघाडी केलेले संदीप यांनीही राष्ट्रवादीत उडी मारली. हे दोघेही कुलाटी मास्टर आहेत. एक घर बीडचे भविष्य काय सुधारणार? असा सवाल करत तुम्ही सर्व एक व्हा, आणि मजलिसला साथ द्या. मग भूतबंगल्याची काय अवस्था होते ती पहा , असे खा. ओवेसी म्हणाले. यावेळी सय्यद मतीन, शेख शफीकभाऊ, शेख निजाम, शेख अमर आदींची भाषणे झाली. सभेस एमआयएमचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.