बीड जिल्ह्यात ‘त्या’ केंद्रांवर ठेवावे लागेल यंत्रणेला लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:17 IST2018-02-21T00:17:02+5:302018-02-21T00:17:20+5:30
बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ही परीक्षा ...

बीड जिल्ह्यात ‘त्या’ केंद्रांवर ठेवावे लागेल यंत्रणेला लक्ष
बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागासह प्रशासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. जिल्ह्यात एकही उपद्रवी यंदा नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले असले तरी ग्रामीण भागातील नेहमी चर्चेत असणारी ‘ती’ केंदे्र कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.
बीड जिल्ह्यात ९० परीक्षा केंद्र असून ३८ हजार ८३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात सर्वात कमी विद्यार्थी एमसीव्हीसी आणि वाणिज्य शाखेचे आहेत. तर सार्वाधिक विद्यार्थी हे विज्ञान आणि त्यापाठोपाठ कला शाखेचे आहेत. बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमिवर मागील आठवड्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परीषद प्रशासनातील अधिकारी, शिक्षण विभागाची (दक्षता समिती) बैठक झाली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, दोन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि विशेष महिला पथक असे मुख्य सहा भरारी पथक परीक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणार आहेत. याशिवाय स्थानिक स्वंतत्र पथकेही राहणार आहेत.
बोर्डाने या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन शिक्षकांनी केले आहे.
काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही
दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणा-यांची टक्केवारी खूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापास होऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वाटत असते. अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
व्हॉटसअॅपवरही नजर
सोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सअॅपवर मागील वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फिरली होती. त्यामुळे मुळे या वर्षी खबरदारी घेत वर्गातच १० वाजून ५० मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी लागू
परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रि या संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये केंद्र व त्याच्या २०० मीटर परिसरात २१ फेब्रुवारी ते २४ मार्च २०१८ या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे. अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, सर्व झेरॉक्स केंद्र, फॅक्स केंद्र व ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असा आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केला आहे.
केंद्रांवर राहणार बंदोबस्त
बुधवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र संचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइल वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील.