किरायदारांकडून घर बळकावण्याचा प्रयत्न; करार करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:06+5:302021-07-08T04:23:06+5:30
बीड : शहरातील स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लोकांनी गाळे काढले आहेत. तसेच राहत्या घरीदेखील भाड्याने देण्याच्या उद्देशाने वेगळ्या रूम ...

किरायदारांकडून घर बळकावण्याचा प्रयत्न; करार करणे गरजेचे
बीड : शहरातील स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लोकांनी गाळे काढले आहेत. तसेच राहत्या घरीदेखील भाड्याने देण्याच्या उद्देशाने वेगळ्या रूम बांधलेल्या असतात. मात्र, अनेक भाडेकरूंकडून घरमालकांस त्रास होतो. अनेक दिवस राहिल्यानंतर घर खाली करण्यास नकार दिला जातो. हा वाद विकोपाला गेल्याचे प्रकारदेखील घडतात.
घर भाड्याने देताना समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड, त्याच्याकडे असलेल्या मतदान कार्डची झेरॉक्स, परिसरातील प्रतिष्ठित माणसाने कोणाला ओळखतो? याचीसुद्धा खात्री करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे किरायदार जर घर बळकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला हाकलण्यास सोपे जाते. दरम्यान, काही ठिकाणी घरातील भाडेकरू घराबाहेर निघत नसल्यामुळे सर्व प्रकारातून सुटका करून घेण्यासाठी मालमत्ता विक्री केल्याचे प्रकारदेखील घडलेले आहेत. त्यामुळे सर्व बाजूने विचारपूस करून घर भाड्याने देणे आवश्यक आहे.
....
घर भाड्याने देताना ही घ्या काळजी
भाडे करारनामा करून घ्यावा. त्यात सर्व गोष्टी नमूद कराव्यात.
समोरच्या व्यक्तीचा ओळखीचा फोटो आयडीदेखील आपल्याकडे ठेवावा.
ज्या परिसरात भाडेकरू राहायला आला त्याने जुने घर का सोडले याची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच घरातील सर्व बाबी व्यवस्थित असून, जशाच्या तशा राहिल्या पाहिजेत. यासंदर्भात करारात उल्लेख करणे आवश्यक आहे.
....
अनेक प्रकरणे न्यायालयात
घरातील पाणीपट्टी, वीज बिल यावरून घर मालक व किरायदार यांच्यात भांडणे होतात.
भाडे वेळेवर न देणे, घर खाली न करणे, भाडे घेण्यासाठी आल्यावर मालकाला शिव्या देणे.
लोकांच्या सांगण्यावरून घर मालकासोबत भांडण्याचे प्रकार वाढले आहेत.
एखादा भू-माफिया जागा बळकावण्यासाठी किरायादारांमध्ये भांडणे लावतो, पडद्याआड राहून साथ देतो.
अनेकदा ऐरणीवर आलेली भांडणे मध्यस्थाच्या प्रयत्नाने अर्थाअर्थी सोडविली जातात. अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यातदेखील मिटविण्यात आली आहेत.
....
पोलीस ठाण्यास द्यावी माहिती
नवीन भाडेकरू राहण्यासाठी आल्यानंतर तसेच परप्रांतीय भाडेकरू असेल तर त्याच्यासंदर्भातील सर्व माहिती हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. तसे केले नाही, तर घरमालकावर कायदेशीर कारवाई होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
....