शिक्षिका पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST2021-03-22T04:29:45+5:302021-03-22T04:29:45+5:30
पतीस तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, दंड अंबाजोगाई : शिक्षिका असलेल्या पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवून तीन ...

शिक्षिका पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न
पतीस तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, दंड
अंबाजोगाई : शिक्षिका असलेल्या पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा अंबाजोगाई येथील अपर सत्र न्यायाधीश एस.एस.सापटनेकर यांनी शनिवारी ठोठावली. श्रीधर पंढरी गायकवाड रा.दहीफळ ता.केज असे आरोपीचे नाव आहे.
केज तालुक्यातील दहीफळ येथील मनिषा श्रीधर गायकवाड या शिक्षिका आहेत. त्यांचे पती श्रीधर गायकवाड यास दारूचे व्यसन होते. व्यसनामुळे तो सतत पत्नीचा शारीरिक व मानसी छळ करत असे. २८ सप्टेंबर २०१५ रोजी श्रीधर याने पत्नीकडे बिअर शॉपी टाकण्यासाठी पैशाची मागणी केली. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला असता, श्रीधर याने घरातील रॉकेलची भरलेली कॅन घेऊन शिक्षिका असलेल्या पत्नीच्या अंगावर टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद केज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
पोलिसांनी श्रीधर गायकवाड याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला व आरोपीस अटक केली. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अपर सत्र न्यायालयात आले. न्या.एस.एस. सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील रामेश्वर ढेले यांनी आरोपी विरुद्धचे सादर केलेले ठोस पुरावे व त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी श्रीधर गायकवाड यास तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. रामेश्वर ढेले यांनी काम पाहिले.