दुचाकीला धडक देऊन दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST2021-01-04T04:28:12+5:302021-01-04T04:28:12+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील मूर्ती येथील शेतकरी दाम्पत्य नंदागौळ येथील आजारी नातेवाइकाला भेटून दुचाकीवरून परत गावाकडे येत होते. त्यांच्या पाठलागावर ...

दुचाकीला धडक देऊन दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
अंबाजोगाई : तालुक्यातील मूर्ती येथील शेतकरी दाम्पत्य नंदागौळ येथील आजारी नातेवाइकाला भेटून दुचाकीवरून परत गावाकडे येत होते. त्यांच्या पाठलागावर असलेल्या तिघांनी जुन्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून दुचाकीला जीपने धडक देऊन त्या दाम्पत्याला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. या घटनेत पती गंभीर जखमी झाले असून, पत्नी कोमात गेली आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२० रोजी घडली. शनिवारी गुन्हा दाखल झाला.
मूर्ती (ता. अंबाजोगाई) येथील मुंजाजी रखमाजी फड यांच्या फिर्यादीनुसार १९ डिसेंबर रोजी सकाळी ते पत्नी ऊर्मिला यांच्यासह दुचाकीवरून (एमएच १२ एचडब्ल्यू ०६२६) नंदागौळ येथील आजारी नातेवाइकाला भेटण्यासाठी गेले होते. तिथून दुपारी ३ वाजता ते मूर्तीला परत जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी घाटनांदूर येथील एका दुकानातून पाण्याच्या मोटारीचे साहित्य घेतले. त्या दुकानाशेजारी लिंबाजी राम नागरगोजे याचे दुकान आहे. लिंबाजीने फड दाम्पत्याला पहिले होते. फड आणि नागरगोजे यांच्यात जुना कौटुंबिक वाद आहे. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फड दाम्पत्य दुचाकीवरून गावाकडे निघाले. यावेळी लिंबाजी नागरगोजे, त्याचा मुलगा दत्तात्रय आणि पिराजी वैजनाथ मुंडे यांनी जीपमधून (एमएच ४३ एटी ८३९७) त्यांचा पाठलाग सुरू केला. उडवा यांना, जीवे मारून टाका असे म्हणत त्यांनी दोन वेळेस फड यांच्या दुचाकीला कट मारला. फड यांनी तशीच दुचाकी दामटली. ते आनंदवाडी फाट्याच्या पुढे आले असता पाठीमागून बोलेरो गाडीतून आलेल्या तिघांनी फड यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून पडून फड दाम्पत्य गंभीर जखमी झाले. तेव्हा फाट्यापासून बोलेरो वळवून आरोपी पुन्हा जीवे मारण्यासाठी येऊ लागले. तेवढ्यात पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून येत असलेले मुंजाजी फड यांचे भाऊ हनुमंत व भावजय चांगुनाबाई यांनी त्यांच्याजवळ येत आरडाओरडा सुरू केल्याने आरोपी घाटनांदूरकडे निघून गेले. हनुमंत यांनी जखमी मुंजाजी आणि ऊर्मिला यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. ऊर्मिला यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सरू असून त्या सध्या कोमात आहेत. असा घटनाक्रम मुंजाजी फड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून लिंबाजी नागरगोजे, दत्तात्रय नागरगोजे आणि पिराजी मुंडे या तिघांवर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पीएसआय जिरगे करत आहेत.