अट्टल महाविद्यालयाने केला रस्त्यावर कला सादर करणाऱ्या कलाकारांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:49+5:302021-03-05T04:33:49+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक यांना अद्भुत आनंद देणारे हे कलाकार भिक्षुकी करणारे आणि बक्षिसांवर विसंबून असतात. मात्र मराठवाडा शिक्षण प्रसारक ...

अट्टल महाविद्यालयाने केला रस्त्यावर कला सादर करणाऱ्या कलाकारांचा गौरव
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक यांना अद्भुत आनंद देणारे हे कलाकार भिक्षुकी करणारे आणि बक्षिसांवर विसंबून असतात. मात्र मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयाने या कलाकारांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून दिला बहुमान. या अभूतपूर्व आयोजनाने कलावंत भारावले. शाळेची पायरीही न चढलेले हे कलावंत आपल्या सादरीकरणातून व्यक्त होत होते. सध्या नागपूर येथे स्थायिक झालेल्या लोककलावंत शहनाज बानो, अय्युब शेख व त्यांचे सहकारी यांनी संगीतमय सादरीकरण करून दाद मिळवली. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग आयोजित या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रा. शरद सदाफुले यांनी गेवराई येथील पंचायत समितीसमोर या कलावंतांना सादरीकरण करताना पाहिले आणि या कलावंताना निमंत्रित करून महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे यांना सुचवला. प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी प्रस्तावाला मान्यता देऊन हा आगळावेगळा उपक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला. विशेषतः विद्यार्थिनींना बाहेर रस्त्यावर इच्छा असूनही उभे राहून गाणी ऐकता येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमात विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे, प्रा. रेवणनाथ काळे, डॉ. सुदर्शना बढे आणि राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी वेगवेगळ्या फर्माईश केल्या.
मानधन आणि बक्षीस तर मिळाले; मात्र शिकलो असतो तर आज रस्त्यावर कला सादर करण्याची वेळ आली नसती, अशी भावना व्यक्त करताना कलावंतांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. डॉ. समाधान इंगळे यांनी यावेळी प्रस्ताविक केले तर डॉ. संदीप बनसोडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर डॉ. विजय सांगळे, राष्ट्रीय छात्र सेना शिबिराच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या कॅंपसमधील सैन्यातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
===Photopath===
040321\img-20210304-wa0243_14.jpg