आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:03+5:302021-01-13T05:28:03+5:30

आष्टी : बीड- आष्टी- अहमदनगर मार्गावर शुक्रवारी पोखरी गावाजवळ दुचाकी- चारचाकी धडकेत पती जागीच ठार, तर पत्नी ...

The Ashti-Kada road is a death trap | आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

आष्टी : बीड- आष्टी- अहमदनगर मार्गावर शुक्रवारी पोखरी गावाजवळ दुचाकी- चारचाकी धडकेत पती जागीच ठार, तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी ९ वाजेदरम्यान आष्टी शहराजवळील हंबर्डे काॅलेजजवळ आतिश उबाळे (२२) हे घराकडून आष्टी येथील पंपावर कामाला जाताना अपघातात गंभीर जखमी झाले. दरम्यान, या मार्गावर डिसेंबरपासून आजपर्यंतचा हा १० वा अपघात ठरला आहे. चालकांचा वेगावर अंकुश नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहनचालक या मार्गावर भरधाव वाहन चालवताना दिसून येतात. तालुक्यातील पांढरी येथील युवक आतिश उबाळे (२२) नाथ पेट्रोल पंपावर सकाळी घराकडून दुचाकीने (क्र. एमएच-२३ ए-६६११) जाताना नगरहून बीडमार्गे जात असलेल्या चारचाकीने (क्र. एमएच-०९ बीबी-००१२) जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी आतिश उबाळे याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस हवालदार बन्सी जायभाय, पोलीस शिपाई शिवप्रसाद तवले, पोलीस शिपाई अश्रुबा बर्डे यांनी भेट देऊन जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्यास मदत केली.

दरम्यान, या मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चिंचपूर- आष्टी- कडा २७ किलोमीटर अंतरावर डिसेंबर ते आजपर्यंत १० मोठ्या व छोट्या अपघातांत ४ जणांना जीव गमावावा लागला असून, काही जण गंभीर जखमी होऊन अधू झालेले आहेत. यामुळे या रस्त्यावर गतिरोधक टाकून वेगाला मर्यादा घालावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाढत्या अपघातांना ब्रेक लावा

नवीन रस्ता असल्याने वाहनचालक अधिक वेगाने गाडी चालवत आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने प्रशासनाने हे गांभीर्याने घ्यावे.

-राम नागरगोजे सामाजिक कार्यकर्ते

हेल्मेटचा वापर करा

वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा. वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.

-सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी

Web Title: The Ashti-Kada road is a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.