कापसाच्या आगारात सोयाबीनचे क्षेत्र कमालीचे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:38+5:302021-06-23T04:22:38+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : कापूस लागवडीवर होणारा जादा खर्च व सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या भावाचा परिणाम म्हणून या वर्षी सोयाबीनचे ...

कापसाच्या आगारात सोयाबीनचे क्षेत्र कमालीचे वाढले
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : कापूस लागवडीवर होणारा जादा खर्च व सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या भावाचा परिणाम म्हणून या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने वाढलेले दिसत आहे. सध्या बाजारात सोयाबीन बियाण्यांची बॅग ऑनमध्येदेखील मिळणे मुश्कील झाले असून कपाशीच्या बॅगा मात्र शिल्लक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कापसाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजलगाव तालुक्यात खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड केली जात असे. परंतु मागील १०-१२ वर्षांपासून या भागातील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेत आहेत. या सोयाबीन क्षेत्राचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
मागील वर्षी माजलगाव तालुक्यात २३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर या वर्षी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. मागील वर्षी सोयाबीनला ८ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाल्याने पुढील वर्षी भाव कमी झाला तरी एवढा कमी होईल, असे वाटत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. कापसाला लागत असलेली मेहनत, खर्च, पाणी आदी पाहता सोयाबीनचे पीक कमी वेळात चांगले उत्पन्न देऊन जाते. त्यानंतर सोयाबीन काढून त्या जागेवर रब्बीचे पीकही घेता येते, असा अंदाज बांधत शेतकऱ्यांनी भर दिल्याने या वर्षी सोयाबीनचे पेराक्षेत्र २९ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. तर कापसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
त्यामुळे कृषी विभागाने बांधलेला अंदाज पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम सध्या बाजारपेठेतही जाणवत आहे. सोयाबीन बियाण्यांची बॅग ऑनमध्येदेखील मिळणे मुश्कील झाले असून कापूस बियाण्यांच्या बॅगा दुकानदाराकडे मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.
------
कापूस व सोयाबीनचे बियाणे आम्ही कृषी विभागाकडून अंदाज घेऊन खरेदी करतो. या वर्षीही त्याचप्रमाणे बियाणे खरेदी करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांनी सोयाबीन पेऱ्याकडे कल दिल्याने बाजारातील बियाणे पूर्णपणे संपले होते. कापसाच्या बियाण्यास पाहिजे तसा ग्राहक न मिळाल्याने व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापसाच्या बॅगा शिल्लक आहेत. - रामानंद भंडारी, बियाणे विक्रेते
------
पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाले तरी कापसाचे पीक येऊ शकते. परंतु सोयाबीनला पाणी कमी पडल्यास पीक हातचे जाण्याची शक्यता असते. या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवल्याने बाजारातील बियाणे पूर्णपणे संपले. शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावे.
- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी पंचायत समिती, माजलगाव