जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० नव्या बेडला मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:04+5:302021-04-05T04:30:04+5:30
अंबाजोगाई : तालुक्यात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ लक्षात घेता लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व व मानसिक ...

जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० नव्या बेडला मान्यता द्या
अंबाजोगाई : तालुक्यात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ लक्षात घेता लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व व मानसिक आजार केंद्रात सुरु केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी नवीन १०० बेड, आवश्यक असणारा वैद्यकीय स्टाफ, सफाई कामगारांसोबत आर. सिस्टीमची एक्स रे मशीन तत्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
लोखंडी सावरगाव येथे १०० बेडच्या कोविड रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे, परंतु सद्य परिस्थितीत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या सदर रुग्णालयात जवळपास ९८ रुग्ण उपचारासाठी ॲडमिट आहेत. या रुग्णांना मधल्या बेड कमी पडत आहेत. त्यमुळे त्वरित १०० ऐवजी २०० बेडची मंजुरी द्यावी व त्याप्रमाणे डॉक्टर्स, स्टाफ नर्स, वाॅर्ड बॉय, टेक्निशियन व औषधी उपलब्ध करून द्यावी. तसेच एक्स-रे मशीन व टेक्निशियन, त्वरित उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहितीस्तव देण्यात आलेल्या आहेत.
शनिवारी ११२ नवे रुग्ण
अंबाजोगाई तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या सतत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ३ एप्रिल रोजी ११२ नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयात गुपचूपपणे उपचार घेत असलेले अनेक रुग्ण आपला त्रास वाढला की कोविड सेंटरकडे अचानक धाव घेतात. त्यामुळे या वाढीव रुग्णांच्या उपचारासाठी नवीन १०० बेडची मागणी करण्यात आली आहे.
८०० बेडची व्यवस्था उपलब्ध
अंबाजोगाई व परिसरातील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण उपचारासाठी अंबाजोगाई येथील कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. सध्या शहरात स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीसीसीएच कोविड हॉस्पिटलमध्ये २०० बेड, लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमधील स्त्री वंध्यत्व व उपचार केंद्रात ४०० बेड, वृद्धत्व आजार व उपचार केंद्रात १०० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वसतिगृहात ५० अशा ७५० बेडची सुविधा उपलब्ध आहे. आ. मुंदडा यांनी केलेली मागणी मंजूर झाली तर शहरात ८५० कोविड रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होईल.