माजलगाव शहरासाठी नवीन ५७८ घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:27+5:302021-02-25T04:41:27+5:30
माजलगाव : पंतप्रधान घरकुल याेजनेअंतर्गत माजलगाव नगरपरिषदेला २०२०-२१ या नवीन वर्षात घरकुलांचे ५७८ नवीन प्रस्ताव मंजूर झाले ...

माजलगाव शहरासाठी नवीन ५७८ घरकुलांना मंजुरी
माजलगाव : पंतप्रधान घरकुल याेजनेअंतर्गत माजलगाव नगरपरिषदेला २०२०-२१ या नवीन वर्षात घरकुलांचे ५७८ नवीन प्रस्ताव मंजूर झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे पूर्ण करून बांधकाम सुरू करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना नगराध्यक्ष शेख मंजूर म्हणाले की, पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत माजलगाव शहरातील गरीब कुटुंबाना साधरणतः ११०० घरकुले आतापर्यंत मंजूर झाली आहेत. या योजनेमध्ये केंद्र शासन लाभधारकांना निम्मी रक्कम देते. तर राज्यशासनाचाही निम्मा वाटा या योजनेसाठी दिला जातो. या योजनेमुळे गरजू व गरीब घटकातील कुटुंबांची घरे उभी राहत आहेत. मागील घरकुलाचा पहिला, दुसरा हप्ता लाभधारकांना देण्यात आला आहे. उर्वरित रक्कमसुध्दा नगरपरिषदेच्यावतीने लवकरच देण्यात येणार आहे. नवीन लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी माजलगाव नगरपरिषदेने साधारणतः ५७८ प्रस्ताव पाठविले होते. यामध्ये सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. याची यादी लवकरच नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून साधारण अडीच लाख रुपये मिळतात. नवीन मंजूर झालेल्या सर्व लाभधारकांनी माजलगाव नगरपरिषदेकडून आपला अधिकृत बांधकाम परवाना काढून व कायदेशीररित्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी केले आहे.
माजलगाव शहर घरकुल प्रस्ताव मंजुरी
२०१८-१९ - ५६६
२०२०-२१ - ५७८
२.५० लक्ष रूपये १ घरकुलासाठी शासन निधी
बांधकाम झालेले - १००