बीड : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत लाभार्थींना आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून, एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.
२०२१-२२ या वर्षाकरिता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली असून, या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत; परंतु, त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झालेली नाही ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील, असे अर्ज २०२१-२२ या वर्षात ग्राह्य धरले जातील. त्याकरिता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही.
महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना यात शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.
या संकेतस्थळावर करावेत अर्ज
महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.fov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाइल, संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.जी. मुळे यांनी केले आहे.