आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:34+5:302021-03-05T04:33:34+5:30
बीड : केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावे या ...

आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
बीड : केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी ५ मार्च रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांनी केले आहे.
कार्यालयास गाजर गवताचा विळखाबीड : शहरातील माळीवेस भागातील महावितरणच्या उप विभागीय कार्यालयाच्या परिसरात गाजर गवत उगवले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेची मागणी जोर धरू लागली आहे.
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यासाठी टपरी चालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देण्याची गरज आहे. मात्र अनेक विक्रेते काचेच्या ग्लासात चहा देऊ लागले आहेत. यामुळे संसर्ग उद्भवू शकतो. यासाठी कागदी ग्लासचा वापर प्राधान्याने करावा. अशी मागणी चहाप्रेमींमधून आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठडयांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्युज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे.
वीजतारांचा धोका, नागरिकांमध्ये भीती
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. तसेच त्या जीर्णही झाल्या आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या तारांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. महावितरणने याकडे लक्ष देत तारा ताणून घेण्याची तसेच दुरूस्तीची मागणी आहे.
पांदण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेताना देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.