राज्यात एएनएम, जीएनएमच्या विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:51+5:302021-01-08T05:47:51+5:30
बीड : राज्यात पहिल्यांदाच एएनएम (साहाय्यकारी परिचारिका प्रसविका) व जीएनएम (सामान्य परिचारिका व प्रसविका) साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार ...

राज्यात एएनएम, जीएनएमच्या विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षा
बीड : राज्यात पहिल्यांदाच एएनएम (साहाय्यकारी परिचारिका प्रसविका) व जीएनएम (सामान्य परिचारिका व प्रसविका) साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडली. ४ जानेवारीपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु अद्यापही प्रतीक्षा यादीच लागली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी यादीची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. केवळ महाडीबीटीच्या तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रेंगाळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
यावर्षी कोरोनामुळे सर्वच कारभार ऑनलाइन झाला आहे. तसाच एएनएम, जीएनएमच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील ३५ प्रशिक्षण संस्थांमध्ये एएनएमच्या ६६० तर जीएनएमच्या ६९० जागांसाठी १८ डिसेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. आलेल्या अर्जांची ३० डिसेंबरपर्यंत छाननी, १ जानेवारीपर्यंत ऑनलाइन गुणवत्ता यादी तयार करणे, २ जानेवारीला प्रतीक्षा यादी प्रसिद्ध, ३ जानेवारीला गुणवत्ता यादीप्रमाणे मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी करून ४ जानेवारीला प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्यात येणार होते; परंतु अद्याप प्रतीक्षा यादीच जाहीर करण्यात आलेली नाही. इकडे राज्यभरातील विद्यार्थी यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील बीड व लोखंडी सावरगाव येथे प्रत्येकी २० जागांचा कोटा आहे. येथेही शेकडो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
कोट
महाडीबीटीच्या तांत्रिक अडचणींमुळे थोडा उशीर झाला आहे. दोन दिवसांत प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल. ३१ जानेवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरू नये. लवकरच प्रक्रिया पूर्ण करू.
सुनीता गोल्हाई
उपसंचालक, आरोग्य सेवा (शुश्रूषा) मुंंबई