खर्च करण्यास पैसे दिले नसल्याचा राग; चुलत्याचा खून करणारा पुतण्या गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:06+5:302021-01-08T05:49:06+5:30
येथील जनार्धन मुंजा धोंगडे(चपला बुटाचा आठवडी बाजारात विक्रीचा व्यवसाय, वय ५५) यांना चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे (वय २८) ...

खर्च करण्यास पैसे दिले नसल्याचा राग; चुलत्याचा खून करणारा पुतण्या गजाआड
येथील जनार्धन मुंजा धोंगडे(चपला बुटाचा आठवडी बाजारात विक्रीचा व्यवसाय, वय ५५) यांना चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे (वय २८) याने रविवारी खर्च करण्यासाठी उसने पैसे मागितले होते. चुलते जनार्धन धोंगडे यांनी अडचण असल्याने पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याचा राग पुतण्या अर्जुन धोंगडे यांच्या मनात बसला. सोमवारी परळीचा आठवडी बाजार करून वाहनाने घाटनांदूर येथे येऊन येथील संत रोहिदासनगर येथील घराकडे जनार्धन धोंगडे जात होते. त्यांच्या पाळतीवर असलेल्या चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे याने अगदी घरासमोरच अचानक कुकरीसारख्या तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, हातावर व शरीराच्या इतर भागावर सपासप वार करून भररस्त्यात चुलत्यास गंभीररित्या जखमी केले. जनार्धन धोंगडे यांना घाटनांदूर प्राथमिक केंद्रात उपचारास्तव ॲटोमध्ये आणले असता वै.अ. विलास घोळवे यांनी गंभीर परिस्थिती पाहता अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर जनार्धन धोंगडे यांचा मृत्यू झाला.
फरार होत असलेल्या आरोपीस पोलीस जमादार अनिल बिकड यांनी उशिरा ताब्यात घेतले. अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षक सुनील जायभाये, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव राऊत यांनी रात्री उशिरा साडेअकरा वाजता घटना स्थळाची पाहणी केली आहे. रात्री बाराच्या दरम्यान मयताची मुलगी वैशाली बापूराव वाघमारे हिच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास सावंत करत आहेत.
पैसे मागण्याचे कारण सांगितले जात असले तरी नेमका खून का व कशासाठी झाला याचे कारण शोधले जात आहे. मयत जनार्धन धोंगडे यांचा मुलगा गंगाधर धोंगडे हे पुणे येथे बिल्डर व्यवसायात असून ते पहाटे घाटनांदूर येथे मित्रमंडळीसह पोहचले आहेत.