रस्ता, नाल्यांच्या अर्धवट कामाने नागरिकांत संताप - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:29+5:302021-08-23T04:35:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडीलगत असलेल्या नगर परिषदेच्या हद्दीतील एकात्मता कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम गेल्या अनेक ...

रस्ता, नाल्यांच्या अर्धवट कामाने नागरिकांत संताप - A
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडीलगत असलेल्या नगर परिषदेच्या हद्दीतील एकात्मता कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या परिसरातील रहिवाशांनी पाठपुरावा करूनही नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
एकात्मता कॉलनीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते व नाल्यांचे काम रखडलेल्या स्थितीत आहेत. जिथे नाल्या झाल्या तेथील सांडपाणी बाहेर काढून दिलेले नाही. त्यामुळे हे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात साठते. या घाण पाण्यामुळे जागोजागी डबकी साचली आहेत. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. याशिवाय या डबक्यातील पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार निर्माण झाले आहेत. रस्ता न झाल्याने पावसाळ्यात रहिवाशांना चिखलातून यावे-जावे लागते. याचा मोठा त्रास महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाकडे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या; परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.
मोरेवाडीलगत असलेली एकात्मता कॉलनी गेल्या २० वर्षांपासून नगरपालिका हद्दीत समाविष्ट आहे. एकात्मता कॉलनीच्या पूर्वेकडील भागातही सांडपाणी वाहून नेण्यासाठी नालीचे काम अद्यापही झालेले नाही. अगोदरच कोरोना, डेंग्यूची साथ आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या समस्यांसंदर्भात या प्रभागाच्या नगरसेवकांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्षच केले. या परिसरात निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराई होऊन १९ वर्षीय युवकाचा बळी गेलेला आहे. यासंदर्भात येथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनही दिले आहे.
निवेदनावर रामकृष्ण पवार, संतोष कदम, महारुद्र पाळवदे, जालिंदर सोळके, कल्याण सोनवणे, श्रीधर उडाळकर, रामदास शिंदे, रामकिसन अंबाड, प्रभाकर कांबळे, सुनील मस्के, सतीश पांचाळ, प्रभाकर देशमाने, राजाभाऊ स्वामी, पंकज खांडेकर, उद्धव कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
....
...तर कर का करायचा? सलग पाच वर्षे पाठपुरावा करूनही जर पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसतील तर माजलगाव नगर परिषदेला कसलाही कर आकारणी करण्याचा अधिकार नाही. या प्रभागाचे नगरसेवक फक्त मते मागण्यासाठीच येतात. त्यांना कर्तव्याचा विसर पडलेला आहे.
-रामकृष्ण पवार, ज्येष्ठ नागरिक, एकात्मता कॉलनी, अंबाजोगाई.
210821\5531img-20210821-wa0102.jpg
माजलगाव शहरातील एकात्मता कॉलनीमधील नाले व रस्त्यांची झालेली दुरवस्था.