महावितरणविरोधात रोष; बीडमध्ये पहिल्याच दिवशी बाप्पांची रात्र अंधारात
By सोमनाथ खताळ | Updated: September 1, 2022 17:20 IST2022-09-01T17:20:39+5:302022-09-01T17:20:59+5:30
रात्रभर वीज गायब : नियमित सोडाच पण उत्सव काळातही सेवा देण्यात महावितरण अपयशी

महावितरणविरोधात रोष; बीडमध्ये पहिल्याच दिवशी बाप्पांची रात्र अंधारात
बीड : लाडक्या गणरायाचे स्वागत बुधवारी उत्साहात करण्यात आले. परंतू बाप्पाला पहिलीच रात्र अंधारात काढावी लागली. बीड शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडीत होता. त्यामुळे ग्राहकांसह गणेश भक्तांमधून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच नियमित तर वीज पुरवठा खंडीत होतोच परंतू सण उत्सव काळातही वीज गायब होत असल्याने महावितरणबद्दल रोष व्यक्त होत आहे. येथील अभियंता व कर्मचारी सेवा देण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि निर्बंधमुक्त साजरा केला जात आहे. बुधवारी सकाळपासूनच ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूका सुरू झाल्या. रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी बाप्पांचे स्वागत केले. त्यांची प्रतिष्ठापणाही उत्साहात केली. बाप्पा येताना पाऊस घेऊन आल्याने भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. परंतू शहरातील शिंदे नगर, मित्र नगर, तुळजाई चौक, पांगरी रोड, जालना रोड, बार्शी रोड, पेठबीड आदी भागातील वीज रात्रभर तर काही भागात पाच ते सहा तांसासाठी वीज गुल होती. नागरिकांसह मंडळांनी अभियंता, लाईनमनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतू अनेकांचे फोन बंद होते, तर ज्यांचे लागले त्यांनी फोन घेतले नाही, अशा तक्रारी आहेत. एरव्ही तर सुरळीत सेवा मिळतच नाही, परंतू सण उत्सव काळातही वीज गायब होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. महावितरणचे अधिकारी करतात काय? गणेशोत्सवापूर्वी काय नियोजन केले? जिल्हधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन केले जात नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. महावितरणच्या सेवेबद्दल भक्तांसह ग्राहकांमध्ये रोष आहे.
ग्रामीण भागातील वीजही गायब
बुधवारी केवळ बीड शहरातीलच नव्हे तर धारूर, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी आदी ठिकाणचही वीज गायब होती. त्यामुळे गणेश भक्तांसह नागरिकांचे हाल झाले. केवळ नियोजन नसल्याने आणि मान्सूनपूर्वक कामे व्यवस्थित न झाल्यानेच वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होत आहे. महावितरणने मान्सूनपूर्व कामे केवळ कागदावरच केली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढे तरी सेवा सुरळीत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एखाद्या घराची वीज गेली असेल. आमचे सर्व सबस्टेशन आणि फिडर चालू आहेत. मित्र नगर आणि इतर भागात कंडक्टर तुटले होते. त्यामुळे वीज गायब होती. माजलगावसह इतर भागातील वीज सुरळीत झाली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणची वीज का गायब झाली? याची सर्वच माहिती मला पाठ नसते. तेथे कार्यकारी अभियंता असतात, त्यांना विचारा.
- वाय.बी.निकम , अधीक्षक अभियंता, महावितरण बीड