अंबाजोगाईच्या सुपुत्राचा दिल्लीत झेंडा ; ‘ईएसआयसी’च्या वैद्यकीय उपायुक्तपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:56 IST2021-10-07T19:56:20+5:302021-10-07T19:56:48+5:30
डाॅ. शिरीषकुमार चव्हाण यांच्यामुळे बीड जिल्ह्याची मान उंचावली

अंबाजोगाईच्या सुपुत्राचा दिल्लीत झेंडा ; ‘ईएसआयसी’च्या वैद्यकीय उपायुक्तपदी नियुक्ती
अंबाजोगाई (जि. बीड) : तालुक्यातील हातोल्याचे सुपुत्र डाॅ. शिरीषकुमार गुलाबराव चव्हाण यांची नवी दिल्ली येथील कर्मचारी वैद्यकीय विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) वैद्यकीय शिक्षणच्या वैद्यकीय उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या या सुपुत्राने दिल्लीत यशाचा झेंडा फडकवल्याने बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. ईएसआयसी ही भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येणारी शाखा आहे.
डाॅ. शिरीषकुमार चव्हाण यांचे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांची मुंबई येथे सहयोगी प्राध्यापकपदी नेमणूक झाली. नंतर त्यांना बढती मिळून त्यांची केरळ राज्यातील कोलम येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकपदी नियुक्ती झाली.
सध्या ते चेन्नई येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचे कार्य लक्षात घेता, त्यांची नियुक्ती नवी दिल्ली येथील कर्मचारी वैद्यकीय विमा राज्य महामंडळाच्या (ईएसआयसी) वैद्यकीय शिक्षणच्या वैद्यकीय उपायुक्तपदी करण्यात आली आहे. राज्य सरकारमध्ये असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालक या पदाशी समकक्ष असणारे हे पद आहे. ‘ईएसआयसी’ तथा ‘कराबीनि’चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.