भिलेगाव येथे पोकरा प्रकल्पांतर्गत शेती दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:34+5:302021-02-05T08:25:34+5:30
बीड : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भिलेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय ...

भिलेगाव येथे पोकरा प्रकल्पांतर्गत शेती दिन उत्साहात
बीड : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भिलेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक सोनवणे, प्रकल्प सहायक प्रताप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळेमध्ये शेती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मागील सात शेती शाळेमध्ये अवलंबलेल्या तंत्रज्ञानावर प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली.
शेती शाळेतील तंत्रज्ञान ब्रॉड बेड फरो (बीबीएफ), बीज प्रक्रिया करणे, सापळा पिके लावणे, कापूस व मूग आंतरपीक करणे, पक्षी थांबे उभारणे, शेंडे खुडणे, रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे लावणे, चर काढणे, कामगंध सापळे लावणे, पाच टक्के निंबोळी अर्क फवारणे, एकात्मिक कीड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन, फरदडमुक्त अभियान या बाबींचा अवलंब केल्यामुळे, तसेच हवामान आधारित पीक सल्ल्यामुळे अनावश्यक फवारणी टळून उत्पादन खर्च कमी लागल्याचे प्रगतिशील शेतकरी मुक्तेश्वर कडभाने यांनी सांगितले. शिवप्रसाद येळकर यांनी रासायनिक कीटकनाशकांचे मानवी शरीरावर आणि कृषी परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम समजावून सांगून रासायनिक कीटकनाशकांवर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी पर्याय म्हणून दशपर्णी अर्क वापरण्याचा सल्ला दिला. गावामध्येे उपलब्ध असलेल्या कडूलिंब, सीताफळ, पपई, घाणेरी, करंज, पांढरी रुई, धोतरा, कन्हेरी, बेशरम या वनस्पतींचे रासायनिक महत्त्व सांगून पाल्यापासून दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. तसेच पोकरा प्रकल्पांतर्गत योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
शेतीशाळा प्रशिक्षक गोविंद साखरे, राहुल मुंडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन हवामान आधारित पीक सल्ला माहितीपत्रके शेतकऱ्यांना वाटप केली. यावेळी अप्पाराव कडभाने, विठ्ठल चव्हाण, रामेश्वर चव्हाण, सोमनाथ कडभाने, शिवाजी माने, गोविंद कडभाने, उत्तम कडभाने, कृष्णा कडभाने, मुक्तेश्वर कडभाने, अमृत कडभाने, भगवान कडभाने, मारुती कडभाने, लक्ष्मण कडभाने, परमेश्वर शिंदे, स्वप्निल कडभाने, लिंबाजी कडभाने, सुग्रीव घाडगे, विठ्ठल चव्हाण, आदी शेतकरी उपस्थित होते.