वय ४६, एचआरसीटी २५, ऑक्सिजन १८, १२२ दिवसांनंतर सुखरूप घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:13+5:302021-08-28T04:37:13+5:30
सोमनाथ खताळ पॉझिटिव्ह स्टोरी बीड : कोरोना काळात अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात बीडच्या जिल्हा रुग्णालयाला यश आले ...

वय ४६, एचआरसीटी २५, ऑक्सिजन १८, १२२ दिवसांनंतर सुखरूप घरवापसी
सोमनाथ खताळ
पॉझिटिव्ह स्टोरी
बीड : कोरोना काळात अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात बीडच्या जिल्हा रुग्णालयाला यश आले आहे. केजमधील ४६ वर्षीय रुग्णाचा एचआरसीटी स्कोअर २५ होता, तसेच ऑक्सिजन लेव्हल अवघी १८ वर आली. तो रुग्ण ७६ दिवस बायपॅपवर होता. अशातही त्याने जिद्द सोडली नाही, तर डॉक्टर, परिचारिकांनी उपचाररूपी परिश्रम सोडले नाहीत. त्यामुळेच १२२ दिवसांनी हा रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयाबद्दल पुन्हा एकदा विश्वास वाढला आहे.
केज तालुक्यातील सारूळ येथील श्रीहरी ढाकणे हे २८ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. एचआरसीटी केल्यावर स्कोअर १८ आला. ऑक्सिजन लेव्हलही सुरुवातीला केवळ ३३ होती. त्यानंतर स्कोअर कमी होण्याऐवजी वाढला आणि २५ वर पोहोचला. ऑक्सिजनही १८ वर आला. ४५ लिटरने ऑक्सिजन सुरू होता. सर्वच घाबरले होते. डॉक्टर, परिचारिकांनी मात्र हार मानली नाही. रुग्णाला ७६ व्हेंटिलेटर व बायपॅप ठेवले. अखेर त्यांना यातून बाहेर काढण्यात यश आले. शुक्रवारी १२२ दिवसांनी ढाकणे यांना जिल्हा रुग्णालयातून सुटी करण्यात आली. आतापर्यंत सर्वांत जास्त दिवस उपचार घेतलेला रुग्ण म्हणूनही त्यांची नोंद झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन रमा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष धूत, डॉ. महेश माने, डॉ. रेवडकर, डॉ. बाळासाहेब टाक यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, परिचारकांनी त्यांना ठणठणीत करण्यासाठी परिश्रम घेतले.
---
वजनही १०७ वरून ६० वर
ढाकणे यांचे कृषी दुकान आहे. ते रुग्णालयात दाखल झाले तेव्हा १०७ किलो वजन होते. सुटी होतेवेळी त्यांचे वजन ४७ ने कमी होऊन अवघे ६० वर आले होते. नातेवाईक डॉ. रेश्मा मुरकुटे यांनी ही माहिती दिली.
---
मला टीमचा अभिमान
सरकारी रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळत नाहीत, दुर्लक्ष करतात, असे आरोप केले जातात; परंतु येथेही चांगले उपचार होतात, याचा हा पुरावा आहे. सुविधांबाबत कमी पडत असू; पण उपचारात कोठेच कमी नाही. अतिशय गंभीर असलेला रुग्ण १२२ दिवसांनंतर सुखरूप घरी परततोय, याचा खूप आनंत होतोय. हेच आमचे यश असून, माझ्या सर्व टीमचा मला अभिमान आहे.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
270821\27_2_bed_6_27082021_14.jpeg
१२२ दिवसानंतर श्रीराम ढाकणे यांना सुटी झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ.सुखदेव राठोड यांच्यासह टिमने त्यांचा सत्कार केला.