दोन तपानंतर रस्त्याचा वनवास संपतोय ; बागपिंपळगाव-तलवाडा-टाकरवण-सावरगाव रस्त्याचे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:53+5:302021-01-08T05:49:53+5:30
तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - ...

दोन तपानंतर रस्त्याचा वनवास संपतोय ; बागपिंपळगाव-तलवाडा-टाकरवण-सावरगाव रस्त्याचे काम वेगात
तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - सावरगाव या रस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. बागपिंपळगाव म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग ५२ पासून राजापूरपर्यंतचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. काही पूल व वरील एक थर बाकी आहे. यामुळे प्रवास मात्र सुसह्य झालेला आहे.
गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती. मोठ-मोठ्या खड्ड्यांसह खडी, धूळ व दोन्ही बाजूंनी वेढलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती. या भागातील ३०-४० गावांतील लोकांना प्रवास करताना मरणयातना भोगाव्या लागत होत्या. ऊस वाहतूक करणारी वाहने उलटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे यामुळे या भागात ऊस वाहतुकीस वाहने देण्यास कोणी धजावत नव्हते.
पण हायब्रीड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास दीडशे कोटी रुपये निधी मिळाल्यानंतर गतवर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोना, पावसाळा यामुळे कामाची गती थोडी मंदावली होती. आता मात्र, या कामाला वेग आला असून बागपिंपळगावपासून राजापूरपर्यंतचा २५ कि.मी. रस्ता चांगला झाला असल्याने या मार्गावरील वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.
या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे, खडी व धुळीचा त्रास सहन करत जीव मुठीत धरुन प्रवास करायचे, पण सध्या जवळपास २५ कि.मी. रस्ता जवळपास पूर्णत्वास असल्याने वाहनधारकांत समाधान आहे.
ऊसमालकांचा जीव भांड्यात
तालुक्यातील ही गावे गोदाकाठावरील गावे म्हणून ओळखली जातात. उसाचे पाठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांतून अनेक कारखाने ऊस नेतात, पण रस्ता खराब असल्याने वाहने उलटल्यामुळे वाहनांसह ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. ऊस वाहन कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत ऊसमालकासह वाहनमालक चिंतेत असायचे. आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
१५ ते २० गावांची वाहतूक झाली सुसह्य
आजपर्यंतच्या झालेल्या कामाने १५-२० गावांतील वाहतूक सुसह्य झाली असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर ४०-५० गावांची सोय होणार आहे.
वाहतूक वाढून रोजगाराच्या संधी
सावरगावपासून बागपिंपळगावपर्यंत रस्ता पूर्ण झाल्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, माजलगावहून जाणारी वाहने अंतर कमी होत असल्याने सावरगाव-राजेगाव-टाकरवण तलवाडामार्गे औरंगाबादकडे जातील. यामुळे या रस्त्यावर हाॅटेल, रसवंतीसह इतर व्यवसाय वाढून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.