धारूर ( बीड) : परभणी येथे संतोष देशमुख हत्याप्रकरणी निघालेल्या मोर्चानंतर जनतेला संबोधित करताना मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. त्यावरून बीड जिल्ह्यातील परळी येथे रविवारी तर सोमवारी बीड, अंबाजोगाई नंतर धारूर येथे मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी परभणी येथे निघालेल्या मोर्चानंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख करत व मराठा आणि वंजारा समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. बीड जिल्ह्यातील वंजारा समाजसह ओबीसी समाजाने याचा निषेध नोंदवत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. परळी येथील शिवाजीनगर पोलीसांत सात तास हे आंदोलन केल्यानंतर जरांगे यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, धारूर येथे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून वंजारा समाज बांधवांनी धारूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करत जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर दुपारी एक वाजता मनोज जरांगेंवर बाबासाहेब तिडके ( रा.भोगलवाडी) यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.