केज : तालुक्यातील मस्साजोग येथे असलेल्या अवादा पवन ऊर्जा कंपनीत खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरांकडून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तसेच येथे अनेक वेळा चोऱ्या झाल्याच्याही घटना घडल्याने पोलिस सुरक्षा यंत्रणा पुरवू शकत नसल्यामुळे अवादा कंपनीने महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) यांचे शुल्क भरून सुरक्षा घेतली आहे. आता अवादा कंपनी आणि त्यांच्या सर्व कामाच्या ठिकाणी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे आता सशस्त्र संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत.
मस्साजोग शिवारातील अवादा पवन ऊर्जा कंपनीचे केज तालुक्यातील बालाघाट डोंगर पट्ट्यात अनेक ठिकाणी पवन चक्की उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, या पवन ऊर्जा कंपनीत अनेक वेळा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या घटना घडल्या आहेत. खंडणीला विरोध केल्याच्या प्रकारातून मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. अवादा पवन ऊर्जा गोदामात अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या असून पवन ऊर्जा उभारणीच्या विडा शिवारातील साइटवरही १३ लाखांचे साहित्य चोरीला गेले आहे. या सर्व प्रकारामुळे कंपनीने पोलिसांकडे पोलिस सुरक्षा मागितली होती, परंतु पोलिस विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) ची सशस्त्र सुरक्षा सेवा पुरविली आहे. त्यांचे अधिकारी आणि २५ जवान हे रात्रंदिवस कंपनीची सुरक्षा करणार असून साइटवरदेखील राहणार आहेत.
लोकमत बातमीचा इफेक्टअवादा कंपनीच्या मुख्य गोदामासह ज्या ठिकाणी पवन चक्की उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे त्या ठिकाणी पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्य चोरीच्या घटना घडल्या होत्या. लोकमत अंकामध्ये गुरुवारी ‘अवादाच्या साहित्याची चोरांना गोडी’ या आशयाची बातमी झळकताच अवादा पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यामुळे आता मुख्य गोदामासह कामाच्या साइटवरही सशस्त्र सैनिकांचा पहारा राहणार आहे.