बीडनंतर नेकनूर, लोखंडीतही होणार शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:06+5:302021-06-18T04:24:06+5:30
बीड : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयासह सर्वच आरोग्य संस्थांमधील शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. बुधवारी बीडमध्ये मुहूर्त लागल्यानंतर आता नेकनूर आणि लोखंडी ...

बीडनंतर नेकनूर, लोखंडीतही होणार शस्त्रक्रिया
बीड : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयासह सर्वच आरोग्य संस्थांमधील शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. बुधवारी बीडमध्ये मुहूर्त लागल्यानंतर आता नेकनूर आणि लोखंडी सावरगाव येथेही शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. उपसंचालक डॉ. एकनाथ माले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी गुरुवारी ठाण मांडत हे सर्व नियोजन केले. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून शहरी आरोग्य विभागाचा कारभार संथ होता. परंतु, डॉ. साबळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कारभार हाती घेताच यंत्रणा कामाला लागली आहे. ओपीडी, आयपीडीतील रुग्णसंख्या वाढण्यासह उपचार आणि सुविधा मिळताना दिसत आहेत. तसेच कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. बुधवारी बीड जिल्हा रुग्णालयात दीड वर्षानंतर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता याच धर्तीवर नेकनूर रुग्णालय आणि लोखंडी सावरगर येथील वृद्धत्व रुग्णालयातही शस्त्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत सर्व वैद्यकीय तज्ज्ञांना सूचना केल्या असून सर्व साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. डॉ. माले व डॉ. साबळे यांनी दिवसभर या दोन संस्थेत ठाण मांडत शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. यामुळे सामान्यांचा आर्थिक भुर्दंड कमी होणार असून दिलासा मिळाला आहे.
३५० खाटांचे रुग्णालय रिकामे
लोखंडी येथील ३५० खाटांचे वृद्धत्व रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी रिकामे करण्यात आले आहे. येथे ओपीडी, आयपीडी आणि शस्त्रक्रिया गृह तयार करण्यात आले आहे. पहिल्यांदाच येथे शस्त्रक्रिया होणार आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांची उपस्थिती होती.
लोखंडीतच मेडिकल बोर्ड
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मेडिकल तपासणीसाठी बीडमध्ये यावे लागत होते. केज, अंबाजोगाई, धारूर या शहरांना याचा त्रास होत होता. हाच धागा पकडून आता लोखंडी सावरगाव येथेच एक दिवस मेडिकल बोर्ड ठेवला जाणार आहे. तसे आदेश उपसंचालक डॉ. माले यांनी यंत्रणेला दिले आहेत.
नेकनूरमध्ये होणार बगिचा
नेकनूर रुग्णालय आवारात जागा मोकळी आहे. येथे रुग्ण व नातेवाइकांना बसण्यासाठी बगिचा तयार केला जाणार आहे. यात फुलांची व सावली देणाऱ्या झाडांचा समावेश असेल.
सुरक्षेसाठी पोलीस चौकी
लोखंडी येथील रुग्णालय आणि रुग्णसंख्या पाहता येथे स्वतंत्र पोलीस चौकी तयार केली जाणार आहे. याचा प्रस्ताव तयार केला असून याला लवकरच मंजुरी मिळेल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.
---
जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम आणि सदृढ करण्यासह रुग्णसेवा आणि सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. शस्त्रक्रिया, ओपीडी, आयपीडीचा नियमित आढावा घेतला जात आहे. उपसंचालक डॉ. एकनाथ माले हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणखी संकल्पना डोक्यात असून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
===Photopath===
170621\17_2_bed_7_17062021_14.jpeg~170621\17_2_bed_6_17062021_14.jpeg
===Caption===
नेकनूर रूग्णालयात शस्त्रक्रिया गृहाची तपासणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ.शिंदे, डॉ.सुधिर राऊत आदी.~लोखंडी सावरगा येथे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी भेट देत पूर्ण आढावा घेतला. यावेळी डॉ.सुरेश साबळे, डॉ.चंद्रकांत चव्हाण आदी.