घरफोडी, दुचाकी चोरणारे आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:20+5:302021-02-05T08:28:20+5:30
बीड : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून दुचाकी व मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त ...

घरफोडी, दुचाकी चोरणारे आरोपी गजाआड
बीड : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून दुचाकी व मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून या चोरट्यांचा शोध सुरु होता. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून केज येथून एकास ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने घरफोडी केल्याची देखील कबुली दिली. ही कारवाई २९ जानेवारी रोजी रात्री करण्यात आली.
जुबेर उर्फ पाप्या मुस्ताक फारोकी (रा.रोजामोहल्ला केज) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन आरोपीला हाताशी धरून त्याच्या माध्यमातून मोबाईल व दुचाकी चोरी तसेच घरफोड्या करत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून जुबेर उर्फ पाप्या फारोकी याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व रोख रक्कम मिळून आली. याविषयी माहिती विचारली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तर पोलिसांना दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदारासोबत मिळून केज येथील नेहरूनगर भागातील फेरोज शेख यांच्या घरी चोरी केली. तसेच बसस्थानक व इतर ठिकाणावरून मोबाईल तसेच फुलेनगर, वसंत विद्यालय, केज परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीकडून १५ मोबाईल व ४ दुचाकी व रोख २ हजार रुपये असा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दुल्लत, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, युनूस बागवान, सखाराम पवार, सायबर सेलचे विक्की सुरवसे, कलीम शेख, घुंगरट, अतुल हराळे यांनी केली.
इतर आरोपी व गुन्हे उघडकीस येणार
घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यानंतर केज पोलीस त्याचा तपास करत आहेत. त्याच्याकडून इतर गुन्हे व साथीदार यांची माहिती घेऊन त्यांनी केलेले अन्य गुन्हे देखील उघडकीस येणार अस्लयाची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.