चिंचाळ्यात अतिसाराची साथ; ८४ जणांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:33+5:302021-07-18T04:24:33+5:30
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे मागील चार दिवसांपासून जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ...

चिंचाळ्यात अतिसाराची साथ; ८४ जणांना लागण
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे मागील चार दिवसांपासून जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत. याबाबत शनिवारी आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असतात तब्बल ८४ रुग्ण आढळून आले आहेत. गावात होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने ही अतिसाराची साथ पसरल्याचा अंदाज व्यक्त केला असून ग्रामपंचायतला आरोग्य विभागाने उपाययोजनांबाबत पत्रही दिले आहे.
चिंचाळा गावात अतिसाराचे रुग्ण आढळत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना देण्यात आली. शनिवारी त्यांनी तत्काळ कुप्पा आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पथक गावात पाठविले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले असता तब्बल ८४ लोकांना अतिसाराचे आजार असल्याचे समोर आले. या सर्वांना आरोग्य उपकेंद्रात आणून औषधाेपचार करण्यात आले. तसेच पुढील सात दिवस नियमित सर्वेक्षण केले जाणार आहे. परंतु, सध्या ग्रामस्थ आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले.
काय आढळले सर्वेक्षणात?
पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत ब्लिचिंग पावडर न टाकता विहिरीत टाकले जाते. तसेच याच ठिकाणी एक व्हॉल्व लिकेज असून दूषित पाणी यातून जलवाहिनीत जाते. गावातही अनेक ठिकाणी जलवाहिनी लिकेज असल्याचे दिसले. या सर्व त्रुटी पाहून आरोग्य विभागाने ग्रामसेवक व सरपंच यांना पत्र देऊन तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ग्रामसेवकांचे गावाकडे दुर्लक्ष
चिंचाळा गावासाठी बाबूराव मोराळे म्हणून ग्रामसेवक आहेत. त्यांचे गावात कधीच लक्ष नसते. त्यांच्या दुर्लक्षामुळेच गावात अतिसाराची साथ आली आहे. शनिवारी गावात आरोग्य पथक असतानाही ग्रामसेवक मोराळे हे गावात नव्हते. आता या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे केली आहे.
---
कोण काय म्हणतंय...
याबाबत ग्रामसेवक बाबूराव मोराळे म्हणाले पाण्याच्या टाकीवर जाता येत नसल्याने विहिरीतच ब्लिचिंग पावडर टाकली जाते. शनिवारी मी गावात नव्हतो, हे खरे आहे. गावातील अतिसाराचे कारण मलाही समजेना झाले आहे.
सरपंच शिवाजी मुंडे म्हणाले, उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे म्हणाले, पथक पाठवून सर्वेक्षण केले असता ८४ रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार केले असून पुढील सात दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे.
--
चिंचाळा गावातील अतिसाराबद्दल तात्काळ ग्रामसेवक, आरोग्य पथक व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील. याची लगेच माहिती घेतो.
अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड
170721\17_2_bed_19_17072021_14.jpeg
चिंचाळा उपकेंद्रात ग्रामस्थांची तपासणी करताना आरोग्य पथक दिसत आहे.