मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:53+5:302021-06-03T04:23:53+5:30

बीड : कोरोना असो की लॉकडाऊन, ५ जूनचा मोर्चा बीडमध्ये निघणारच. मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा ...

Accept the demands, otherwise face agitation | मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा

मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा

बीड : कोरोना असो की लॉकडाऊन, ५ जूनचा मोर्चा बीडमध्ये निघणारच. मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी प्रशासनास दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाची हाक देण्यात आली आहे. ५ जून रोजी बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आहे, असे आमदार मेटे यांनी सांगितले.

मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा या नावाने आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारला आहे. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या आनुषंगाने आमदार विनायक मेटे गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा पिंजून काढत आहेत. शनिवारी नेकनूर, चौसाळा सर्कलसह बीड शहरामध्ये पूर्वतयारी बैठका घेतल्यानंतर रविवारी लिंबागणेश, राजुरी, नाळवंडी सर्कलमध्ये त्यांनी पूर्वतयारी बैठका घेतल्या आहेत.

तसेच मंगळवारी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करून गेवराई, माजलगाव परळी व अंबाजोगाई या ठिकाणी पूर्वतयारी बैठका घेऊन मोर्चात सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यादरम्यान बीडमधील मोर्चा राजकीय आहे, असे म्हणणाऱ्यांनी समाजासाठी काय केले हे दाखवावे, असे आव्हान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार विनायक मेटे यांनी दिले. मराठा समाजातील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी व या नाकर्ते सरकारला जाग आणण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवले आहे त्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झालाय. हा आक्रोश पाच जून रोजीच्या बीड येथील मोर्चातून दिसून येईल. शासनावर विविध माध्यमातून दबाव आणल्यानंतर ईडब्ल्यूएस या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शासनाला लाथा घातल्याशिवाय कुठलाही निर्णय केला जात नाही. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी व त्यांना मंजूर करून घेण्यासाठी बीड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे, असे आमदार मेटे यांनी सांगितले.

या आंदोलनाच्या उभारणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी आम्ही बैठका घेतल्या या बैठकाच्या माध्यमातून लोकांना सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करत आहोत. सर्व नियमांचे पालन करून बीड येथील मोर्चा कुठल्याही परिस्थितीत संपन्न होईल. आतापर्यंतचे मोर्चे मूक स्वरूपाचे होते. मात्र या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या समस्यांवर आवाज उठवला जाणार आहे, असेही आमदार विनायक मेटे म्हणाले. आज झालेल्या बैठकप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी. बी. जाधव, मंगेश पोकळे, संजय पवार, हरीष शिंदे, कैलास माने, उत्तम पवार, अभिजित देशमुख, सुनील आडसूळ हे उपस्थित होते.

===Photopath===

020621\02bed_3_02062021_14.jpg

===Caption===

विनायक मेटे

Web Title: Accept the demands, otherwise face agitation