MLA Suresh Dhas: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक असलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्ह्यात सुरू असलेले अनधिकृत व्यवसाय, चुकीच्या लोकांना दिलेले शस्त्रपरवाने या मुद्द्याबाबतचे निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार धस यांनी दिली. तसंच यावेळी त्यांनी खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड यांच्यावरही भाष्य केलं आहे.
"वाल्मिक कराड यांचे आका धनंजय मुंडे यांनी कराड यांना पोलिसात हजर व्हायला सांगावं. पोलीस तर तपास करतच आहेत. लवकरच वाल्मिक कराडांना अटक केली जाईल. ते सरेंडर होणार असल्याची चर्चा आहे. मात्र सरेंडर होण्यावरून वाल्मिक कराड आणि त्यांचा 'आका' यांच्यात द्वंद सुरू असल्याची माझी माहिती आहे," असं म्हणत सुरेश धस यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुरेश धस यांनी यावेळी आरोपींच्या संपत्तीच्या चौकशीचीही मागणी केली आहे. "बीड जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अनधिकृत धंद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. राख, वाळू, हातभट्टी या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावण्यात आली आहे," असा आरोप धस यांनी केला.
दरम्यान, पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्या पत्नीसह जवळच्या व्यक्तींची सीआयकडून कसून चौकशी केली जात आहे. तसंच कराड याच्या आर्थिक नाड्याही आवळल्या जात आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड याला आत्मसमर्पणाशिवाय पर्याय नसल्याचं बोललं जात आहे.