जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:19+5:302021-01-09T04:28:19+5:30
बीड : जिल्ह्यात गतवर्षी जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे प्रकल्पीय पाणीसाठा समाधानकारक राहिला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या गुरुवारच्या ...

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा
बीड : जिल्ह्यात गतवर्षी जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे प्रकल्पीय पाणीसाठा समाधानकारक राहिला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या गुरुवारच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठ्या, अशा एकूण १४४ प्रकल्पांमध्ये ८१.१४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यात माजलगाव, मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पांत मिळून ८८.४७ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, तसेच गोदावरी व कृष्णा खोऱ्यांतर्गतच्या असलेल्या १६ मध्यम प्रकल्पांमध्ये व १२६ प्रकल्पांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
परतीच्या पावसाने यंदा जिल्ह्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत ३०० कोटींहून अधिकचे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून दर आठवड्याला पाणीसाठा तपासला जातो. ७ जानेवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यात ८१.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यातील १४४ पैकी २ प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरलेले आहेत, तर ७३ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिकचा पाणीसाठा आहे. याशिवाय ३६ प्रकल्पांमध्ये ५२ ते ७६ टक्के पाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील १७ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा असून, ११ प्रकल्पांची पाणीपातळी कमी झाली आहे. यात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे, तसेच ४ लघु प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे, तर १ लघु प्रकल्प कोरडा पडला आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे ऊसक्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे, तर प्रकल्पाजवळील शेतकऱ्यांनी बागायती पिकांवर जास्त भर दिला आहे.