२० पैकी ८ रेल्वे गाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:15+5:302021-02-05T08:23:15+5:30

परळी -येथील रेल्वे स्थानकातून नऊ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या एकूण २० रेल्वे गाड्यांपैकी आठ रेल्वे गाड्या सुरू ...

8 out of 20 trains started | २० पैकी ८ रेल्वे गाड्या सुरू

२० पैकी ८ रेल्वे गाड्या सुरू

परळी -येथील रेल्वे स्थानकातून नऊ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या एकूण २० रेल्वे गाड्यांपैकी आठ रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तथापि १२ रेल्वे गाड्या अद्यापही धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून खिशाला फटका बसत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप ही सुरू केले नसल्याने स्पेशल रेल्वेने तिप्पट भाडे मोजावे लागत आहे.

परळी रेल्वेस्थानकातून नांदेड- बंगळूरू, बंगळूरू-नांदेड, काकीनाडा-शिर्डी, शिर्डी- काकीनाडा, नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड, औरंगाबाद-हैदराबाद , हैदराबाद- औरंगाबाद या स्पेशल एक्सप्रेस रेल्वे गाड्या परळी रेल्वे रुळावरून सुरळीत धावत आहेत. या रेल्वेगाड्यांना आरक्षणाशिवाय प्रवास नाही. प्रवाशांना आरक्षण तिकीट घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे व नऊ महिन्यानंतरही पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. काही प्रवाशांना दुपारच्या वेळी परभणी, नांदेडकडे रेल्वे नसल्याने बसने जाण्याची वेळ आली आहे . पूर्णा-हैदराबाद ,हैदराबाद -पूर्णा ,मिरज- परळी, परळी- मिरज, अकोला-परळी, परळी-अकोला, आदिलाबाद -परळी, परळी आदिलाबाद, निझामाबाद- पंढरपूर, पंढरपूर- निझामाबाद, पूर्णा-परळी, परळी -पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून आर्थिक फटका बसत आहे.

मोठ्या अंतरासाठी परळीहून हैदराबादला जाण्यासाठी नऊ महिन्यापूर्वी जनरलने १४५ रुपये लागायचे आता स्पेशल रेल्वेने रिझर्वेशन करून ३८५ रुपये द्यावे लागत आहेत. परळीहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वेने जनरल स्लीपरचे २६० रुपये तिकीट होते तर आता ३५५ रुपये झाले आहे.

छोट्या अंतरासाठी रेल्वेने परळीहून परभणीला पूर्वी पंचवीस रुपये तिकीट लागत होते. आता एक्सप्रेस रेल्वेला पन्नास रुपये तिकीट द्यावं लागतं आहे. छोट्या अंतरावरील गावांना थांबा आता नसल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली असून छोट्या अंतरावरील गावांना आटो रिक्षाने येणे-जाणे करावें लागत आहे.

सर्वसामान्य प्रवासी पॅसेंजर रेल्वे बंद असल्या कारणाने त्रस्त आहेत. परभणी, गंगाखेड पॅसेंजर रेल्वे गाड्या चालू नसल्या कारणाने बस प्रवासामुळे खिशाला जास्त भुर्दंड बसत आहे. हैदराबादसारख्या लांब पल्याच्या पॅसेंजर चालू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हैराण आहेत. परळी स्टेशनवरून पूर्वीप्रमाणे रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. अश्विन मोगरकर, व्यवसायिक परळी.

गेल्या नऊ महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे गाड्या चालू नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे अशक्य झाले आहे, एक्सप्रेस रेल्वे गाड्यामुळे तिकीट जास्त लागत आहे, याचा रेल्वे प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे, पॅसेंजर रेल्वे गाड्या त्वरित चालू करणे आवश्यक आहे.

-जयंत वेताळ ,

कोरोना पूर्वी परळी रेल्वे स्थानकातून २० रेल्वे धावायच्या, आता ८ रेल्वे धावतात.

Web Title: 8 out of 20 trains started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.