बीडच्या लोक अदालतमध्ये वाहनधारकांनी भरला पावणे सात लाखांचा दंड
By सोमनाथ खताळ | Updated: December 9, 2023 19:08 IST2023-12-09T19:07:54+5:302023-12-09T19:08:20+5:30
९३७ केसेस निकाली : वाहतूक पोलिसांनी दाखल केले होती प्रकरणे

बीडच्या लोक अदालतमध्ये वाहनधारकांनी भरला पावणे सात लाखांचा दंड
बीड : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारण्यात आला. परंतू त्यांनी तो भरला नाही. वाहतूक पोलिसांनी शनिवारी लोक अदालमध्ये ही प्रकरणे मांडण्यात आली. यामध्ये ९३७ केसेसमध्ये वाहनधारकांकडून ६ लाख ७५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुसाट वाहने चालवणे, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभा करणे, लायसन्स नसणे, ट्रीपल सीट आदी कारणांवरून पोलिसांकडून वाहनांवर दंड टाकला जातो. परंतू काही वाहनधारक नंतर भरतो, असे म्हणत निघून जातात. पोलिसांकडून वेळच्या वेळी मोहिम राबवून थकीत दंड वसूलीसाठी प्रयत्न केले जातात, परंतू त्यात त्यांना फारसे यश येत नाही. अखेर थकीत केसेस आणि दंडाच्या रकमेचा आकडा वाढत जातो. अशाच जास्त दंड असणाऱ्या ६५ हजार केसेस लोक अदालतमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. यामधील ९३७ वाहधानकांनी अदालतमध्ये उपस्थित राहून ६ लाख ७५ हजार ८५० रूपये दंड भरला आहे. आजा उर्वरित वाहनधारकांना दुसऱ्या वेळी बोलावले जाणार आहे. शिवाय ज्यांच्याकडे जास्त दंड थकीत आहे, त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.
आणखी खटले दाखल होणार
पोलिस महासंचालक यांचे मार्फत ई चालान सिस्टीम मार्फत सर्व वाहनधारकांना नोटीस पाठविली होत्या. लोक अदालतमध्ये ९३७ केसेसमध्ये पावणे सात लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. ज्यांच्याकडे जास्त दंड थकीत आहे, त्यांच्याविरोधात खटले दाखल करण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. लवकरच याची माहिती घेऊन खटले दाखल केले जातील.
- अशोक मोदिराज, पोलिस निरीक्षक, वाहतूक बीड