६५ वर्षीय वृद्धेला अंगावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:34+5:302021-01-10T04:25:34+5:30
शिरूर कासार : जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोमळवाडा येथील नऊ जणांविरुद्ध शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा ...

६५ वर्षीय वृद्धेला अंगावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी
शिरूर कासार : जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोमळवाडा येथील नऊ जणांविरुद्ध शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गोमळवाडा येथील दयाबाई अश्रूबा धनवे (६५) यांनी गुरुवारी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३ जानेवारी रोजी दीड वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या शेतात सर्व्हे नं. १६ मध्ये काशा व धसकटे वेचत असताना गावातील अशोक गवळी, पांडुरंग गवळी, बापूराव सुरे, ज्ञानोबा काकडे यांनी जबरदस्तीने अरेरावी केली. अशोक गवळी हा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर घेऊन आला. त्याला रोटर जोडले होते. हे ट्रॅक्टर माझ्या शेतातून बाहेर काढा असे सांगितले तेव्हा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. येथे काम कशी करतेस. हे आमचे शेत आहे. येथून चालती हो, नाहीतर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालू, असे धमकावत त्याने ट्रॅक्टर थांबवून त्यांना ढकलून दिले. यावेळी दयाबाईंनी आरडाओरड केली असता त्यांचे पती, मुलगा तेथे आले असता त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून अशोक गवळी, पांडुरंग गवळी, बापूराव सुरे, ज्ञानोबा काकडे, मंदाबाई गवळी, शीतल गवळी, सारिका गवळी, भागवत कातखडे या नऊ जणांविरुद्ध अ.जा.ज. अत्याचार प्रतिबंधक कायदा व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे अधिक तपास करत आहेत.