बीडमध्ये ४३ हजार घरे, अधिकृत नळधारक केवळ २८ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:36+5:302021-02-08T04:29:36+5:30
बीड : शहरात घरांची संख्या ४३ हजार एवढी आहे. यात केवळ २८ हजार लोकांकडेच अधिकृत नळ कनेक्शन असल्याचे समोर ...

बीडमध्ये ४३ हजार घरे, अधिकृत नळधारक केवळ २८ हजार
बीड : शहरात घरांची संख्या ४३ हजार एवढी आहे. यात केवळ २८ हजार लोकांकडेच अधिकृत नळ कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. तर जवळपास ४ हजारपेक्षा जास्त घरांत अनधिकृत नळ आहेत. दिवसेंदिवस फुकटात पाणी वापरणाऱ्यांची संख्या वाढत असतानाही पालिकेकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचे दिसते.
शहराची लोकसंख्या २्०११ च्या जनगणनेनुसार २ लाख ३ हजार २४० एवढी आहे. तर ४३ हजार घरे आहेत. यात मोकळ्या जागा व इतर भाग वगळता जवळपास ३२ ते ३३ हजार जागेवर नागरिक वास्तव्यास आहेत. यात केवळ २८ हजार घरांमध्येच पालिकेचे अधिकृत नळ कनेक्शन आहेत. इतर ठिकाणी मात्र, राजकीय दबाव, चोरून अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेले आहे. याच्या तपासणीसाठी पालिकेने सध्या सर्वेक्षणही सुरू केले आहे. आतापर्यंत जवळपास दीड हजार घरांची माहिती घेतली असून यात १० टक्के लोकांकडे अधिकृत नळ कनेक्शन नसल्याचे उघड झाले आहे. या अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पालिकेला आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. सर्व अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
३० टक्के पाणीगळती
शहराला दररोज ३२ एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. परंतु, प्रत्यक्षात केवळ २८ एमएलडी पाणी येते. यातीलही ३० टक्के पाण्याची विविध ठिकाणी गळती होते. याच्या दुरूस्तीवर वर्षाकाठी ८० लाखांची उधळपट्टी केली जाते.
नळपट्टी भरण्यासही अनुत्सूकता
पालिकेकडून नळपट्टी, घरपट्टी आदी मालमत्ताकर वसूल केला जातो. परंतु, जे अधिकृत नळधारक आहेत, तेदेखील नियमित पाणीपट्टी भरत नाहीत. शहरवासियांकडे जवळपास १ कोटीच्या पुढे कर थकल्याचे सांगण्यात आले. त्यातच ४ हजार अनधिकृत नळ कनेक्शनमुळे एका नळाला वार्षिक दीड हजार रुपये कराप्रमाणे तब्बल ६० लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
कोट
अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याचे काम सुरू आहे. यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास याचा ताण आणखी कमी होईल.
राहुल टाळके
अभियंता, पाणीपुरवठा विभाग न. प. बीड
----
शहराची लाेकसंख्या - २ लाख ३ हजार २४०
घरांची संख्या - ४३ हजार
अधिकृत नळधारक - २८ हजार
दररोज पाण्याची आवश्यकता - ३२ एमएलडी
दररोज पाणी येतेय - २८ एमएलडी
पाणीगळती - ३० टक्के
प्रतिमानसी, प्रतिदिन पाणी - १०० लिटर