४ हजार नळ अनधिकृत, वर्षाला ६० लाख ‘पाण्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:55+5:302021-01-04T04:27:55+5:30

लोकमत एक्सक्लूझिव्ह बीड : शहरात फुकटात पाणी वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरात जवळपास ४ हजार नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचे ...

4,000 unauthorized taps, 60 lakh a year in 'water' | ४ हजार नळ अनधिकृत, वर्षाला ६० लाख ‘पाण्यात’

४ हजार नळ अनधिकृत, वर्षाला ६० लाख ‘पाण्यात’

लोकमत एक्सक्लूझिव्ह

बीड : शहरात फुकटात पाणी वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहरात जवळपास ४ हजार नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रत्येक वर्षाला पालिकेला ६० लाख रुपयांचा नळपट्टीच्या माध्यमातून फटका बसत आहे. यामुळे पालिका आर्थिक संकटात सापडली आहे. आता पालिकेने अनधिकृत नळांचे सर्वेक्षण सुरू केले असून १० टक्के नळ अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे.

बीड शहराला माजलगाव धरण व पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या शहराला आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. दररोज प्रती मानसी १०० लीटर पाणी पालिका देते; परंतु शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना अनधिकृत नळ कनेक्शनही वाढले आहेत. नागरिक चोरून नळ कनेक्शन घेऊन पाण्याचा फुकटात वापर करीत आहेत. याबाबत पालिकेला खटकताच मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी पाणी पुरवठा विभागाल सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. १० नोव्हेंबर २०२० पासून याला प्रत्यक्षात सुरुवातही झाली. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १० टक्के नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. आता पालिका त्यांना नोटीस बजावून कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. पाणी पुरवठा विभागातील पी.आर. दुधाळ, एस.एच. परदेशी, अब्दुल हादी, शब्बीर अहेमद, शेरकर, वडमारे, इंगोले, हाडुळे, बागलाने, वडमारे हे पथक सध्या सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. अभियंता राहुल टाळके हे नियमित आढावा घेत आहेत.

कसे होते ६० लाखांचे नुकसान

एका नळाला वर्षाकाठी दीड हजार रुपयांची नळपट्टी भरावी लागते. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात १० टक्के नळ कनेक्शन बोगस आढळले आहेत. एकूण आढावा घेतला असता तब्बल ४ हजारांपेक्षा जास्त कनेक्शन अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले. चार हजार कनेक्शनचे दीड हजाराप्रमाणे तब्बल ६० लाख रुपयांचे नुकसान पालिकेला प्रत्येक वर्षी सहन करावे लागत आहे.

कोट

नळ कनेक्शनचे तीन झोनमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. दैनंदिन पाणी पुरवठा करून ही माेहीम सुरू आहे. आतापर्यंत १,४५० नळांचे सर्वेक्षण झाले आहे. पैकी १० टक्के कनेक्शन अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. लवकरच ते कट केले जातील.

राहुल टाळके

अभियंता, पाणी पुरवठा विभाग न.प. बीड

----

एकूण नळ कनेक्शन - २८,०००

आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण - १,४५०

पावती नसलेले - ७० टक्के

पावती असलेले - २० टक्के

अनधिकृत - १० टक्के

सर्वेक्षणाचे झोन - ३

एकूण कर्मचारी - २७

एकूण सुपरवायझर - ३

वर्षाला एका कनेक्शनला येणारी नळपट्टी - १,५००

Web Title: 4,000 unauthorized taps, 60 lakh a year in 'water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.