केजमध्ये ४० घरांना लावल्या बाहेरून कड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:51+5:302021-02-05T08:21:51+5:30
केज : शहरातील मंगळवार पेठेजवळ शनिमंदिर भागात ४० घरांना अज्ञात व्यक्तीने बाहेरून कड्या लावल्याने खळबळ उडाली. १ फेब्रुवारीच्या ...

केजमध्ये ४० घरांना लावल्या बाहेरून कड्या
केज : शहरातील मंगळवार पेठेजवळ शनिमंदिर भागात ४० घरांना अज्ञात व्यक्तीने बाहेरून कड्या लावल्याने खळबळ उडाली. १ फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला. कडी लावणारा माथेफिरू होता, की चोरटे होते याची चर्चा दिवसभर रंगली.
या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे या भागातील नागरिक संतोष गायके, अनिल सत्वधर यांनी लोकमतला सांगितले. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण असतानाच सोमवारी मध्यरात्रीनंतर चाळीस घरांना बाहेरून कड्या लावल्याचा प्रकार घडला. पहाटे बाहेर जाण्यासाठी घराचे दार उघडत नसल्याने शेजाऱ्यांना उठवत बाहेरून घराच्या दारास लावलेल्या कड्या काढल्यानंतर घराबाहेर जाता आल्याचे या भागातील रहिवासी अनिल सत्वधर व संतोष गायके यांनी सांगितले. नागरिकांनी याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना दिल्यानंतर त्यांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्यात येईल, असे सांगितले.
शेजाऱ्यास उठवत काढली कडी
रात्री झोपताना घराचे दार आतून बंद केले. मात्र पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी घराच्या दाराची आतून लावलेली कडी काढूनही दार उघडत नसल्याने सचिन रोडे यास फोन करून सांगितले असता, त्यांचेही गेट बाहेरून लावलेले आढळून आले. ते गेट हाताने उघडले व अन्य घरांच्या बाहेरून लावलेल्या कड्या काढल्यानंतर या भागातील नागरिकांना घराबाहेर पडता आल्याचे संतोष गायके यांनी दिली.