गुंगीचे औषध वापरून ३९ हजारांचे दागिने उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:10+5:302021-04-11T04:33:10+5:30
माजलगाव : गप्पा मारत बसलेल्या तीन महिलांना कसल्यातरी औषधाने भुरळ पाडून अंगावरील दागिने देण्यास हतबल करून लुबाडल्याची घटना ...

गुंगीचे औषध वापरून ३९ हजारांचे दागिने उकळले
माजलगाव : गप्पा मारत बसलेल्या तीन महिलांना कसल्यातरी औषधाने भुरळ पाडून अंगावरील दागिने देण्यास हतबल करून लुबाडल्याची घटना मंगळवारी शहरातील आझादनगर भागात घडली. फसवणूक झालेल्या महिलेच्या फिर्यादीवरून दोन चोरट्या महिलांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूमिका आनंद साळवे (राहणार चिंचगव्हाण) या आझादनगर येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आई विमल आणि चुलती यांच्यासोबत घरासमोर गप्पा मारत बसल्या होत्या. यावेळी संसारोपयोगी भांडी विकणाऱ्या दोन महिला त्यांच्याकडे आल्या. पेहराव, बोली भाषेवरून त्या परराज्यातील वाटत होत्या. आम्ही कंपनीकडून आलो आहोत, असे म्हणत जुने भांडे घेऊन नवीन भांडे देतो, असे म्हणत त्यांनी ओळख करून घेतली. गप्पांच्या नादात कसल्या तरी गुंगीच्या औषधाचा उपयोग करून भुरळ आणली. भुरळ आल्याने या तीन महिलांनी आपल्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे मिळून तब्बल ३९ हजार २०० रुपयांचे दागिने त्या दोन महिलांना स्वतःहून काढून दिले.
त्या दोन परप्रांतीय महिला दागिने घेऊन फरार झाल्यानंतर कितीतरी वेळाने आपली फसवणूक झाल्याचा प्रकार या महिलांच्या लक्षात आला. लुबाडणूक करणाऱ्या त्या अज्ञात दोन महिलांविरुद्ध भूमिका आनंद साळवे यांनी शुक्रवारी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार दोन महिलांंविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक तळेकर करत आहेत.