६० हजार १८१ शेतकऱ्यांना ३६५ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:14+5:302021-06-28T04:23:14+5:30
बीड : खरीप हंगामात २७ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार १८१ शेतकऱ्यांना ३६५ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात ...

६० हजार १८१ शेतकऱ्यांना ३६५ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप
बीड : खरीप हंगामात २७ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार १८१ शेतकऱ्यांना ३६५ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. एकूण १८ बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत २५ जूनपर्यंत २२.८३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. पीककर्जाच्या नूतनीकरणाचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्याला चालू खरीप हंगामात १६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोरोनाकाळात पीककर्ज वाटपाला गती नव्हती. पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम यांनी बँकांशी समन्वय राखत पीककर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जूनपासून पीककर्ज वाटपाला वेग आला आहे.
बँक ऑफ बडोदाने ८८३ शेतकऱ्यांना दहा कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप केले. बँक ऑफ इंडियाने ५२१ शेतकऱ्यांना चार कोटी ८३ लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रने ४५३ शेतकऱ्यांना चार कोटी चार लाख रुपये, कॅनरा बँकेने १५२ शेतकऱ्यांना एक कोटी २८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. सेंट्रल बँकेने १८९ शेतकऱ्यांना एक कोटी ७४ लाख रुपये, पंजाब नॅशनल बँकेने आठ शेतकऱ्यांना आठ लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाने ९ हजार ३९२ शेतकऱ्यांना ८१ कोटी ५५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. यूको बँकेने ३८ शेतकऱ्यांना ३५ लाख, तर युनियन बँकेने १६० शेतकऱ्यांना एक कोटी २२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. यात एसबीआयचे वाटपाचे प्रमाण सर्वाधिक २०.३९ टक्के आहे.
व्यावसायिक बँकांकडून उदासीनता
ॲक्सिस बँकेने २५ शेतकऱ्यांना ५६ लाख, डीसीबीने ३५ शेतकऱ्यांना ४६ लाख, एचडीएफसीने १२४ शेतकऱ्यांना तीन कोटी ५६ लाख, आयसीआयसीआयने १०५ शेतकऱ्यांना दोन कोटी ५९ लाख रुपये, तर आयडीबीआयने २५२ शेतकऱ्यांना दोन कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आरबीएलने ७३ शेतकऱ्यांना दोन कोटी ९१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. कोटक महिंद्राने अद्याप एकाही शेतकऱ्याला पीककर्ज वाटप केले नाही.
एमजीबीचे २२, तर डीसीसीचे ७३ टक्के वाटप
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १३ हजार ४८७ शेतकऱ्यांना ९३ कोटी २४ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या बँकेला ४१० कोटींचे उद्दिष्ट दिलेले असून, पीककर्ज वाटपाचे प्रमाण २२.७४ इतके आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला २०८ काटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, या बँकेने ३४ हजार २८४ शेतकऱ्यांना १५३ कोटी ५२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. वाटपाचे प्रमाण ७३.८१ इतके आहे.
-----------
मागील वर्षी खरीप हंगामात बीड जिल्ह्याला ९०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यावेळी ३० जूनपर्यंत ३८ हजार ५६६ शेतकऱ्यांना २३४ कोटी चार लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. ते प्रमाण २४ टक्के इतके होते. यंदा जिल्ह्याचे उद्दिष्ट १६०० कोटी रुपये असल्याने टक्केवारीचा आकडा कमी दिसत असला तरी पीककर्ज वाटप झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट आहे. या ६० हजार १८१ शेतकऱ्यांना ३६५ कोटी २७ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत २२.८३ टक्केच आहे.
--------