बीड जिल्ह्यात ३०९ मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:11+5:302021-03-24T04:31:11+5:30

बीड : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ मार्च ते १० मार्चदरम्यान शाळेच्या प्रवाहात ...

309 out of school children in Beed district | बीड जिल्ह्यात ३०९ मुले शाळाबाह्य

बीड जिल्ह्यात ३०९ मुले शाळाबाह्य

बीड : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ मार्च ते १० मार्चदरम्यान शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली होती. कोरोनाच्या स्थितीमुळे अडथळे पार करत सर्वेक्षण करण्यात आले. याचा एकूण अंतिम अहवाल काही दिवसातच प्राप्त होणार असला तरी लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ३०९ मुले शाळाबाह्य आढळून आले आहेत. धारूर तालुक्यात सर्वाधिक ११४ मुले आढळल्याची माहिती आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, अधिकार अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ३ ते १८ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. बीड येथे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन कृती कार्यक्रम आखून या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्र शाळेच्या स्तरावर बैठक घेऊन शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात गाव स्तरावर त्यांनी सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची तसेच ग्रामसेवकांची मदत घेण्यात आली.

५५ टक्के मुली

या शोधमोहिमेत ३०९ मुलांपैकी १६५ मुली तर १४० मुले शाळाबाह्य आढळली आहेत. तर एकूण मुलांमध्ये विशेष गरजाधिष्ठित मुले २२, बालकामगार ४ आणि अन्य विविध कारणांमुळे २८३ मुलांना शाळाबाह्य राहावे लागले आहे. कौटुंबिक गरजांमुळे कचरा वेचणे, मजुरी करणे, भंगार गोळा करणे, आज इथे तर उद्या तिथे याप्रमाणे मजुरीसाठी भटकंती करणाऱ्या कुटुंबातील ही २८३ मुले आहेत. मूलभूत सुविधांअभावी या मुलांना शाळाबाह्य राहावे लागल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे.

७००० कर्मचारी मोहिमेत

शाळाबाह्य मुलांसाठीच्या या शोधमोहिमेत बालरक्षक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचार्य आदी घटकांना सामील केले होते. विविध विभागातील ७ हजार कर्मचाऱ्यांकडून शाळाबाह्य मुले शोधण्याचे काम करण्यात आले.

तालुकानिहाय शाळाबाह्य मुले

अंबाजोगाई ३, आष्टी ७, बीड ३८, धारूर ११४, गेवराई २७, केज २०, माजलगाव २५, परळी ०, पाटोदा २०, शिरूर १६, वडवणी ३९ - एकूण ३०९

----

जिल्ह्यात १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. सर्वच विभागांनी सहकार्य केले. यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी वाडी, वस्ती, तांड्यावर जात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. अहवाल आल्यानंतर संबंधित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यात येईल.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)

------------

परळीत शून्य तर धारूरमध्ये सर्वाधिक

शाळबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत अनेक ठिकाणी काेरोनाचा अडसर होता. तरीही सर्व दक्षता बाळगत शिक्षकांसह इतर विभागांनी काम केले. या मोहिमेत धारूर तालुक्यात ११४ शाळाबाह्य मुले आढळली आहेत. तुलनेने इतर तालुक्यात ही संख्या प्रत्येकी ४० च्या आत आहे. परंतु अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी तालुक्यात ७ व परळी तालुक्यात शून्य मुले शाळाबाह्य आढळणे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. खरोखरच शाळाबाह्य मुले इतकी आहेत की सर्वेक्षणाचे सोपस्कार पार पाडले गेले, हा तपासणीचा विषय आहे.

---------

Web Title: 309 out of school children in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.