बीड : मस्साजोग येथील सरपंच हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेत आला आहे. त्यातच जिल्ह्यात वैयक्तिक वादालाही काही लोकांनी जातीय रंग दिल्याने दोन समाज, दोन जातींमध्ये मारामाऱ्या, दगडफेकीसारख्या घटना घडल्या. २०२४ या चालू वर्षात जिल्ह्यात दखलपात्र व अदखलपात्र असे २३७ गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व कोण घडवतंय? असा सवाल उपस्थित होत असून, सामाजिक सलोखा बिघडत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जिल्ह्यात सध्या किरकोळ कारणावरूनही मोठे वाद होत आहेत. सोशल मीडियावर एखाद्याने पोस्ट टाकली तर लगेच त्याला जातीय रंग देत दगडफेक, मारामारी अशा घटना घडत आहेत. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर याचे प्रमाण वाढले आहे. केज तालुक्यातील नांदूरघाटमध्ये वाद होऊन दगडफेकीची घटना घडली होती.
दोन समाजांतही वाद
जिल्ह्यात २०२४ मध्ये दोन समाजांतही वाद झाल्याच्या घटना घडल्या. यातही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे जुलैत सर्वाधिक ७ गुन्हे दाखल आहेत.
केज तालुका हॉट स्पॉट
मस्साजोगचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. याच केज तालुक्यात सर्वाधिक जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रकार झाले.