माजलगावात २१ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:10 IST2017-12-07T00:09:50+5:302017-12-07T00:10:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : कर्नाटक राज्यातून परभणी व सोलापूरकडे गुटखा घेऊन जाणारा टेम्पो दिंद्रुड पोलिसांनी पकडला. यामधील तब्बल ...

माजलगावात २१ लाखांचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : कर्नाटक राज्यातून परभणी व सोलापूरकडे गुटखा घेऊन जाणारा टेम्पो दिंद्रुड पोलिसांनी पकडला. यामधील तब्बल २१ लाख रुपयांचा गुटखाही जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी पहाटे करण्यात आली. माहिती समजताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी दिंद्रुडला धाव घेत पंचनामा करून दोघांविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दिंद्रुड पोलिसांकडून मंगळवारी रात्री तेलगाव-माजलगाव दरम्यान गस्त घातली जात होती. एवढ्यात एक टेम्पो (एमएच १३ सीयू ०८६९) भरधाव वेगाने जाताना दिसला. पोलिसांना याबाबत संशय आला. त्यांनी टेम्पो चालकास थांबण्यास सांगितले. परंतु त्याने वेगाने टेम्पो पळविला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून टेम्पो नित्रूडजवळ अडविला. तपासणी केली असता टेम्पोमध्ये मागील बाजूस गव्हाच्या पिठाच्या गोण्या दिसल्या. पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी टेम्पोमध्ये जाऊन तपासणी केली असता गोण्याच्या मागे गुटख्याने भरलेले पोते दिसले.
त्यांनी याबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकारी व अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर, ऋषिकेश मरेवार यांनी सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांच्या परवानगीने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून पकडलेल्या गुटख्याचा व टेम्पोचा पंचनामा केला.
याप्रकरणी टेम्पो चालक संतोष नागरगोजे व नाथराव नागरगोजे यांच्याविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सय्यद आसिफ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार युवराज टाकसाळ, कानदास बनसोडे, ए.एस.आय.शेख शब्बीर यांनी केली.