संस्कृत भारतीच्या संस्कृत संभाषण अभियानात २ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:55+5:302021-07-08T04:22:55+5:30
बीड : संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे २३ जून ते ४ जुलैपर्यंत संस्कृत संभाषण अभियान करण्यात आले. संस्कृत भाषेचा ...

संस्कृत भारतीच्या संस्कृत संभाषण अभियानात २ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
बीड : संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे २३ जून ते ४ जुलैपर्यंत संस्कृत संभाषण अभियान करण्यात आले. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार हा उद्देश ठेवून केलेल्या या अभियानात दोन हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या विद्यार्थ्यांना संभाषण प्रशिक्षण देण्यासाठी सत्तरहून अधिक संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रोज सकाळी साडेसहा ते रात्री नऊपर्यंत दोन दोन तासांचे ३१ वर्ग रोज घेतले गेले. या संभाषण वर्गात संस्कृत रोजच्या व्यवहारात बोलता येईल हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला गेला. संस्कृतचा अजिबात परिचय नसताना दहा दिवसांनंतर विद्यार्थी संस्कृत बोलू शकतो हे या वर्गांचे फलित, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.
या अभियानाचा समारोप ४ जुलै रोजी आभासी पद्धतीने साजरा केला. ४६८ अभ्यागतांच्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय अध्यक्ष- संस्कृत भारती आणि सोमनाथ विद्यालय गुजरातचे कुलगुरू डॉ. गोपबंधू मिश्र आणि प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर लाभले. डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी संस्कृत भाषेकडे विज्ञान भाषा म्हणून कसे पाहता येईल याचे मार्गदर्शन केले. संस्कृत श्लोक आणि त्यांचा आजच्या युगातील विज्ञान यांचे संबंध उलगडून दाखविले. .काही श्लोकांवर ते अजूनही नवीन ज्ञानासाठी संशोधन करीत आहेत हे सांगून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. प्रांताध्यक्ष प्राध्यापक जयवंत गायकवाड, प्रांत मंत्री डॉ. गजानन अंभोरे व प्रांत सहमंत्री विनय दुनाखे व गोविंद यांच्या अथक परिश्रमाने सातत्याने हे अभियान आणि हा समारोप सोहळा पार पडला.